वसई : स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या ९० व्या जयंतीचे औचित्य साधून नालासोपारा शिवसेना शाखेने आयोजित केलेल्या शिबिरात १ हजार ५३७ दात्यांनी रक्तदान केले. एकाचवेळी २० ठिकाणी या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सलग २१ व्या वर्षी आयोजित करण्यात आलेले हे शिबीर सायन रक्तपेढी, मिरा भार्इंदर पालिका रक्तपेढी, हायटेक रक्तपेढी मालाड, सेवा रक्तपेढी डोंबिवली यांच्या सहकार्याने संपन्न झाले. ठाकूर विद्यालय जिजाईनगर, नूतन विद्यालय मोरेगांव, लक्ष्मीनगर विराररोड, सेंट्रलपार्क शाखा, लोकमान्य शाळा विजयनगर, जिल्हा परिषद शाळा तुळींज, सरस्वती विद्यालय तुळींज, विद्यावर्धिनी शाळा वालईपाडा, नरवडे शाळा संतोष भुवन, शिवसेना शाखा डोंगरपाडा-बिलालपाडा, चंद्रेश लोढा शाळा गाला नगर, जिल्हा परिषद शाळा आचोळे गांव, एव्हरशाईन सिटी, आयडीएल शाळा अलकापुरी, संयुक्तनगर शाखा, सारस्वत हॉल पांचाळनगर, निळेगांव जिल्हा परिषद शाळा, स्टेट बँक कॉलनी नालासोपारा पश्चिम, बॅसीन कॅथॉलिक बँक समेळपाडा आणि शिवसेना शाखा भंडारआळी अशा २० ठिकाणी सकाळी ९ वाजता या शिबीराला सुरुवात झाली.सायंकाळी ४ वाजेपर्यंत त्यात १५३७ दात्यांनी रक्तदान केले. दरवर्षी या शिबिराला वाढता प्रतिसाद लाभतो आहे. या उपक्रमाचे परीसरात कौतुक होते आहे. शिबिराच्या यशस्वीतेबद्दल आयोजकांनी रक्तदात्यांना धन्यवाद दिलेले आहेत. (प्रतिनिधी)
शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीस २० शिबिरांत १५३६ जणांचे रक्तदान
By admin | Updated: January 24, 2017 05:20 IST