प्रचारातही भाजपालाच करणार टार्गेट!
By Admin | Updated: May 16, 2017 00:19 IST2017-05-16T00:19:16+5:302017-05-16T00:19:16+5:30
प्रचारासाठी हाती असलेल्या आठ दिवसांत भिवंडीत भाजपाला टार्गेट करण्याची खेळी विरोधक खेळण्याची शक्यता आहे. मनोज म्हात्रे हत्या प्रकरणात काँग्रेसने यापूर्वीच

प्रचारातही भाजपालाच करणार टार्गेट!
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : प्रचारासाठी हाती असलेल्या आठ दिवसांत भिवंडीत भाजपाला टार्गेट करण्याची खेळी विरोधक खेळण्याची शक्यता आहे. मनोज म्हात्रे हत्या प्रकरणात काँग्रेसने यापूर्वीच भाजपाचे खासदार कपिल पाटील यांच्यावर आरोप केले होते, तर अर्ज बाद ठरवण्यावरून शिवसेनेने थेट मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केल्याने प्रचारातही भाजपा नेते खास करून खासदार कपिल पाटील टार्गेट असतील, असे दिसून येत आहे.
वस्तूत: गेल्या पाच वर्षाच्या काळातील काँग्रेससह शिवसेना, कोणार्कयांच्या सत्ताकाळात झालेली कामे, विकास हा भाजपाला प्रचाराचा मुद्दा करता येऊ शकतो; पण त्या काळातील कामांवर टीका करताना कोणार्कआघाडीलाही लक्ष्य करावे लागेल. त्या आघाडीशी समझोता केल्याने भाजपाची विनाकारण कोंडी झाली आहे. भाजपाला येथील निवडणुकात गमावण्यासारखे काही नाही; पण खासदार पाटील यांची प्रतिष्ठा मात्र पणाला लागली आहे. पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केल्यानंतर त्या पक्षातील कार्यकर्तेही त्यांच्यासोबत आले. त्यामुळे भाजपाचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीतून भाजपात आलेले कार्यकर्ते असे दोन प्रवाह पक्षात दिसतात. त्यातही पाटील यांच्याकडे सर्व सत्तासूत्रे गेल्यानंतर स्वाभाविकपणे त्यांनी सोबत आलेल्या कार्यकर्त्यांच्या पुनर्वसनाला प्राधान्य दिले. त्यातून हा संघर्ष तीव्र झाला आणि तोच निवडणुकीच्यानिमित्ताने बाहेर पडला.
काँग्रेससाठी इतर परिसरापेक्षा येथे परिस्थिती अनुकूल असल्याने मनोज म्हात्रे यांच्या हत्येनंतर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी लागोपाठ या भागात दौरे केले होते. म्हात्रे हत्या प्रकरणातील आरोपी भाजपाशी संबंधित असल्याने त्यांनी खासदार पाटील यांना लक्ष्य केले. या हत्येचा मुद्दा पुन्हा प्रचारात गाजेल.
समाजवादी पक्षाच्या उत्तर प्रदेशातील पाडावानंतर आणि महाराष्ट्रातही त्यांची लढाई भाजपासोबतच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फोडून पाटील भाजपात गेल्याने राष्ट्रवादीचीही त्यांच्याशीच लढाई आहे. या वातावरणामुळे भाजपा विरुद्ध सारे अशी ही लढाई होत आहे.
शिवसेनेने मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी यापुढे भाजपाशी कुठेही युती नाही हे जाहीर केल्यानंतर ते दोन्ही पक्ष येथेही परस्परांविरोधात लढत आहेत. त्यातच शिवसेनेने भाजपा, कोणार्कच्या उमेदवारांच्या अर्जाला आव्हान दिले. मुख्यमंत्र्यांनी दबाव आणल्याने ते फेटाळले गेल्याचा आरोप करून शिवसेनेने आपल्या भाजपाविरोधातील लढाईचे रणशिंग फुंकले आहे. उल्हासनगरच्या सत्ता स्थापनेवेळी आणि डोंबिवलीत शिवसेनेच्या शहरप्रमुखाला भाजपा नगरसेवकांनी काळे फासल्याने या दोन्ही पक्षातील लढाई निकराची बनली आहे.
याद्यांतील घोळ गाजणार
मतदारयाद्यांतील घोळ, बोगस नावे, दुबार नावांचा मुद्दाही प्रचारात गाजण्याची चिन्हे आहेत. शिवसेना, भिवंडी डेव्हलपमेंट फ्रंटने हा मुद्दा उचलून धरला. त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भाजपावरच आरोप आहेत. कपिल पाटील यांचा प्रभाव असलेल्या ग्रामीण भागातील मतदारांची नावे यादीत असल्याचा आरोप झाल्याने त्याचे वेगळे अर्थ काढले गेले. शिवाय ज्या प्रभागात पाटील यांचा पुतण्या रिंगणात आहे, तेथील नावांचा मुद्दाही असेच वातावरण तापवून गेला. पुतण्याला महापौरपदी बसवण्यासाठी, त्यातून भिवंडीची सत्ता हाती ठेवण्यासाठी गेली अडीच वर्षे पाटील या निवडणुकीत लक्ष घालत असल्याचा दावा त्यांचे पक्षातील आणि पक्षाबाहेरील विरोधक करत असल्याने ही निवडणूक वेगळ््या राजकीय वळणावर गेली आहे. त्यात भाजपापेक्षा पाटील यांच्याभोवतीच ती फिरत आहे.
भाजपाचा भर यंत्रमागांच्या पॅकेजवर
ठाण्याची मेट्रो कल्याणला नेताना भिवंडीमार्गे नेली जाईल, असे आश्वासन भाजपाने मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दिले आहे. शिवाय मुख्यमंत्र्यांनी केलेल्या दोन दौऱ्यात यंत्रमागधारकांना पॅकेज जाहीर करण्यात आले. तसेच यंत्रमागांचे अपग्रेडेशन करण्याची योजनाही जाहीर केली. निवडणुका डोळ््यासमोर ठेवून, मोठा कामगार वर्ग नजरेसमोर ठेवत भाजपाने केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांना खास भिवंडीत आणून हे पॅकेज जाहीर केले. पण यंत्रमागांच्या अपग्रेडेशनला काही काळ जावा लागेल. शिवाय यंत्रमाग कामगारांनाही अजून पॅकेजचा थेट लाभ मिळालेला नाही. त्यामुळे भाजपाचा भर या पॅकेजवर असेल, तर ते पदरी न पडल्याचा मुद्दा विरोधक मांडतील, अशी स्थिती आहे.
काँग्रेसच्या प्रचारापासून नारायण राणे दूरच
भिवंडी : मनोज म्हात्रे यांच्यासारख्या आपल्या खंद्या समर्थकाची हत्या झाल्याने माजी मुख्यमंत्री नारायण राणे भिवंडी महापालिका निवडणुकीच्या प्रचारात भाजपावर त्वेषाने तुटून पडतील, अशी त्यांच्या समर्थकांची अपेक्षा होती. मात्र स्वत: राणेच भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगल्याने आणि काँग्रेसच्या नेत्यासोबत एका व्यासपीठावर ते नजीकच्या काळात न आल्याने त्यांचा रोख समजू शकलेला नाही. शिवाय ते खरोखरच भाजपाच्या वाटेवर असतील, तर त्या पक्षाच्या नेत्यांवर आरोप कसे करायचे, या कोंडीतून ते भिवंडीच्या प्रचरापासून दूर गेले आहेत. जबाबदारी असूनही उमेदवार निवडीतही त्यांनी लक्ष घातलेले नाही.राणे प्रचारापासून का दूर आहेत, याचे कारण कोणताही नेता देण्यास तयार नाही. ते तुम्ही राणे यांनाच विचारा, असे ते सांगत आहेत. राणे जर काँग्रेसतर्फेप्रचारात उतरले असते, तर त्यांनी भाजपा आणि सेना या दोन्ही पक्षांना लक्ष्य केले असते. शिवाय म्हात्रे यांच्या हत्येच्या मुद्द्यावरून त्यांनी भाजपा नेत्यांना घेरले असते. वांद्रे मतदारसंघातील पोटनिवडणुकीत राणे यांनी मुस्लिम समाजाशी चांगला संपर्कठेवला होता. त्यानंतरही भिवंडीत ते येऊन गेले. त्यामुळे काँग्रेसच्या दृष्टीने आवश्यक मतदारांवर त्यांचा चांगला प्रभाव पडला असता; पण राणे यांच्या राजकीय वाटचालीबद्दल संदिग्धता असल्याने ते या प्रचारापासून दूर आहेत. तूर्त तरी राणे आपले पत्ते उघड करण्यास तयार नाहीत.
पदाधिकाऱ्यांचा अपेक्षाभंग : भाजपा, शिवसेनेतही उत्तर भारतीय पदाधिकारी आहेत. उत्तर प्रदेशात भाजपाची सत्ता आल्यामुळे भाजपाकडून तिकीट मिळण्याच्या उत्तर भारतीय पदाधिकाऱ्यांना अपेक्षा होत्या. मात्र, शेवटच्या क्षणापर्यंत हा विचार न झाल्याने त्याचा परिणाम निवडणुकीत दिसून येईल, अशी माहिती सूत्राने दिली.