महिला सक्षमीकरणासाठी बाइक रॅली
By Admin | Updated: March 15, 2016 00:59 IST2016-03-15T00:59:40+5:302016-03-15T00:59:40+5:30
महिला सक्षमीकरण आणि स्त्री-पुरुष समानतेचा नारा देत सुमारे २५० हून अधिक महिला व पुरूष बाईकस्वारांनी रविवारी वसईत रॅली काढली. नवभारत को-आॅप. क्रेडीट सोसायटी आणि वसई-विरार

महिला सक्षमीकरणासाठी बाइक रॅली
वसई : महिला सक्षमीकरण आणि स्त्री-पुरुष समानतेचा नारा देत सुमारे २५० हून अधिक महिला व पुरूष बाईकस्वारांनी रविवारी वसईत रॅली काढली. नवभारत को-आॅप. क्रेडीट सोसायटी आणि वसई-विरार महानगर पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या जागृतीपर प्रचार रॅलीस रॉयल थम्स आणि बर्न या दोघा बाईक रायडर्सच्या ग्रुपने विशेष सहाय्य केले. या रॅलीच्या निमित्ताने वसईच्या रस्त्यावर स्त्री-शक्ती बाईकस्वार होऊन धावली.
महिला सक्षमीकरणाचा संदेश देणाऱ्या बाईक रॅलीला वसईकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. वसई रोड रेल्वे पूलाजवळ पूर्वेच्या चिमाजी आप्पा उद्यानाजवळ विरार, बोळींज, नालासोपारा व तालुक्यातून विविध गावातून आलेले बाईकस्वार एकत्र झाले. रॉयल थम्स ची रायडर्स चैताली कापडी हिच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि सामाजिक कार्यकर्ते विनायक निकम यांच्या हस्ते झेंडा दाखवून रॅलीस प्रारंभ झाला. वसई विरार महानगर पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिलराज रोकडे, लेखक अरविंंद म्हात्रे, सदिच्छा सेवा मित्र मंडळाचे राजाराम बाबर, सोसायटीचे सचिव नरेंद्र राऊत आदी उपस्थित होते.
चार वर्षांपूर्वी ४० बाईकस्वारांच्या सहभागाने महिला दिनानिमित्त सुरू केलेली ही रॅली दरवर्षी अधिक मोठी होत असून महिलांचा सहभाग सतत वाढत आहे. पुढील ५ व्या वर्षी महिलादिनी व्यापक प्रमाणात रॅली काढणार असल्याची माहिती सोसायटीचे चेअरमन नितीन म्हात्रे यांनी प्रास्ताविकात दिली. नवघर-माणिकपूर शहर व पापडी मार्गे जात वसई किल्ल्यातील नरवीर चिमाजी आप्पांच्या स्मारकाजवळ आलेल्या या रॅलीचे ढोल ताशाच्या गजरात आगमन झाले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भालचंद्र पाटील व किरण शिंदे यांनी या रॅलीचे येथे स्वागत केले. यावेळी सोसायटीचे व्यवस्थापक संजय पंडीत, महिला कार्यकर्त्या नयना वर्तक प्रामुख्याने उपस्थित होते. रॅलीत सहभागी झालेल्या बाईक रायडर्स व उपस्थितांचे आभार मानून, पुढील वर्षी संस्मरणीय व सर्वसमावेशक अशी भव्य रॅली काढण्यासाठी विशेष प्रयत्न करू अशी ग्वाही समारोप प्रसंगी पत्रकार संघाच्या अध्यक्षांनी दिली. धवल म्हात्रे, धृवाली वर्तक, हार्दिक म्हात्रे, संजय पंडीत व किरण शिंदे यांनी रॅलीच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. (वार्ताहर)