बविआचेही अवैध कार्यालय पाडा!
By Admin | Updated: February 8, 2017 03:59 IST2017-02-08T03:59:36+5:302017-02-08T03:59:36+5:30
महापालिकेने सत्ताधारी बहुजन विकास आघाडीचे अनधिकृत कार्यालय व बांधकामे तोडावीत अन्यथा आगरी सेना एकतर्फी कारवाईविरोधात

बविआचेही अवैध कार्यालय पाडा!
वसई : महापालिकेने सत्ताधारी बहुजन विकास आघाडीचे अनधिकृत कार्यालय व बांधकामे तोडावीत अन्यथा आगरी सेना एकतर्फी कारवाईविरोधात उपोषण करील असा इशारा जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील यांनी दिला आहे.
शिरगावजवळील कुंभारपाडा येथे अनधिकृत बांधकाम करून आगरी सेनेने कार्यालय सुुरु केले होते. ही चाळ बेकायदा असल्याने महापालिकेच्या पथकाने शनिवारी कारवाई करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी आगरी सेनेच्या एका कार्यकर्त्याने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा इशारा दिला होता. तर तिघांनी गळ्यात दोरी अडकवून गळफास लावून आत्महत्येची धमकी दिली होती. इतकेच नाही तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ, धक्काबुक्की आणि दगडफेक केली होती. त्यानंतर महापालिकेने विरार पोलीस ठाण्यात आगरी सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आता आगरी सेनेचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. सत्ताधारी बहुजन विकास आघाडीचे अनधिकृत कार्यालय आधी तोडा अन्यथा आमरण उपोषण केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. सत्तेचा गैरवापर करून विरोधकांना त्रास देत आहे. हा अन्याय सहन केला जाणार नाही. असा इशारा पाटील यांनी दिला आहे.
दरम्यान, आगरी सेनेचे कार्यालय अनधिकृत आहे. कुणाच्याही दबावाला बळी न पडता त्यावर कारवाई होणारच. पालिका कायद्यानुसार कारवाई करणार असून अनधिकृत बांधकाम तोडले जाईल, असे उपायुक्त अजीज शेख यांनी सांगितले. (प्रतिनिधी)