टिटवाळ्यातील बाप्पा निघाले परदेशी
By Admin | Updated: August 18, 2015 00:18 IST2015-08-18T00:18:37+5:302015-08-18T00:18:37+5:30
बाप्पा घरी येणार, हा आनंद काही वेगळाच असतो. बाप्पांच्या या आगमनासाठी संपूर्ण घरदार तयारीला लागते. मात्र, टिटवाळ्यातील भाई गोडांबे यांच्या कारखान्यातील

टिटवाळ्यातील बाप्पा निघाले परदेशी
टिटवाळा : बाप्पा घरी येणार, हा आनंद काही वेगळाच असतो. बाप्पांच्या या आगमनासाठी संपूर्ण घरदार तयारीला लागते. मात्र, टिटवाळ्यातील भाई गोडांबे यांच्या कारखान्यातील बाप्पा थेट सातासमुद्रापल्याड अमेरिका, इंग्लंड व दुबईला निघाले आहेत.
गणेशोत्सव आता अवघ्या महिन्यावर येऊन ठेपल्याने गणेशमूर्ती तयार करणाऱ्या कारखान्यांत मोठ्या प्रमाणात धावपळ वाढल्याचे चित्र सध्या गणपतीच्या कारखान्यांत पाहावयास मिळते.
टिटवाळ्यातील सामान्य कुटुंबातील भाई गोडांबे हे १९७४ पासून येथील गणपती मंदिरामागे आशीर्वाद कला केंद्र नावाचा गणेशमूर्ती बनविण्याचा कारखाना चालवितात. या कला केंद्राची प्रसिद्धी ठाणे-मुंबईसह हळूहळू महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत पोहोचली. त्यामुळेच येथील बाप्पांना दुबई, अमेरिका, इंग्लंडसह भारतातील हैदराबाद, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, पुणे आणि ठाणे-मुंबईलगतच्या उपनगरांत मागणी वाढली आहे.
गेल्या ५० ते ५५ वर्षांपासून हा व्यवसाय मी आपल्या परिवारासह करीत असल्याचे त्यांनी सांगितले. श्रीकृष्ण, विष्णू, स्वामी समर्थ, छत्रपती शिवराय, शंकर भगवान, टिटवाळ्यातील सिद्धिविनायक अशा मूर्तींसह मराठमोळ्या थाटातील फेटा घातलेल्या व दागिन्यांनी मढविलेल्या मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळतात. केवळ फोटो पाहून हुबेहूब श्रींच्या मूर्ती तयार करणे हीदेखील एक कारागिरांच्या कलेतील खासियत असल्याने भारतासह परदेशांतूनदेखील येथील मूर्तींना सतत मागणी आहे. (वार्ताहर)