बाप्पांच्या विसर्जनाची जय्यत तयारी
By Admin | Updated: September 26, 2015 22:33 IST2015-09-26T22:33:00+5:302015-09-26T22:33:00+5:30
गेले दहा दिवस गणरायाची मनोभावे सेवा केल्यानंतर रविवारी जिल्हाभरात सुमारे ५ हजारांहून अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे.

बाप्पांच्या विसर्जनाची जय्यत तयारी
पालघर/वसई : गेले दहा दिवस गणरायाची मनोभावे सेवा केल्यानंतर रविवारी जिल्हाभरात सुमारे ५ हजारांहून अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे. यासाठी संपूर्ण पालघर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विसर्जन ठिकाणी आणि मार्गांवर सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागामध्ये ५०६ सार्वजनिक तर ४ हजार ७११ घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. या गणेशमूर्तींच्या विसर्जन सोहळयासाठी पोलिसांनी जय्यत तयारी केली असून जादा बंदोबस्त तैनात केला आहे. वसई-विरार महापालिकेने या वर्षीही इकोफ्रेंडली गणेशोत्सव संकल्पना राबवित गणेशमूर्ती विसर्जनाकरिता समुद्र व तलावांच्या किनाऱ्यावर विशेष व्यवस्था केली आहे. याठिकाणी निर्माल्य कलशही उभारले आहेत.
तसेच तलावांच्या ठिकाणी वैद्यकीय पथक, अग्निशमन दल, प्रखर विद्युत व्यवस्था, खाद्यपदार्थ स्टॉल, ध्वनीक्षेपण यंत्रणा आदी सुविधाही उपलब्ध करुन दिली आहे. या विसर्जनाच्या मिरवणुकांमध्ये अधिकाधिक रंगत आणण्यासाठी ढोल पथकांना विशेष मागणी असल्याने पुणे आणि नाशिकमधून ती मोठ्या संख्येने ठाण्यात दाखल झाली आहेत.
दरम्यान, गणेशोत्सव विसर्जनाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी विशेष बंदोबस्त तैनात केला आहे. एक पोलीस अधिक्षक, दोन अप्पर पालीस अधिक्षक, पाच उपविभागिय पोलीस अधिकारी, ९२३ पीएसआय, एपीआय व पोलीस असा फौज फाटा असणार आहे. शिवाय शिघ्र कृती दल व इंडो तिबेटीयन पोलीस फोर्सच्या जवानांना पाचारण केले आहे. त्यांच्या दिमतीला होमगार्डची फौजही तैनात असेल. अतिउत्साही भाविक तलावात व समुद्रात उतरत असल्याने जीवरक्षकही तैनात केले आहेत. विसर्जन मार्गावर ठिकठिकाणी गुन्हे अन्वेषण शाखा व विशेष शाखेच्या पोलिसांची साध्या वेषातील पथके मिरवणुकीवर लक्ष ठेवणार आहेत.
(प्रतिनिधी/वार्ताहर)
भार्इंदरला मुख्य मार्गावरील वाहतुकीत बदल
भार्इंदर : अनंत चतुर्थीला होणाऱ्या गणेश विसर्जनादरम्यान या महानगरातील केवळ मुख्य मार्गावरील वाहतुकीत बदल केल्याचे पोलिस उपअधिक्षक सुहास बावचे यांनी सांगितले. गणेश विसर्जनासाठी एकूण ५५० पोलिसांची बंदोबस्तासाठी नियुक्ती केली असून त्यात १ अतिरिक्त अधिक्षक, ४ उपअधिक्षक, ४५ अधिकारी व ५०० पोलिसांचा समोवश आहे. त्याचप्रमाणे ५० होमगार्ड, ८० वाहतूक कर्मचारी व ट्रॅफीक वॉर्डन, दंगल नियंत्रण पथक, महिला छेडछाड विरोधी पथके, घातपात विरोधी पथके विसर्जन मार्ग व विसर्जन स्थळी तैनात केली आहेत. तसेच शीघ्र कृती दलाच्या तीन पथकांना पाचारण केले असून ते प्रत्येकी काशिमिरा, मीरारोड व नवघर परिसरात सज्ज ठेवण्यात येणार आहेत.
मद्य प्राशन करु न विसर्जनात धिंगाणा घालणाऱ्या तळीरामांवर कारवाई करण्यासाठी खास एक पथक देखील तैनात करण्यात येणार असून हे पथक ब्रीथ अॅनलायझरच्या सहाय्याने तळीरामांची तपासणी करु न त्यांच्याविरु द्ध कारवाई करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार, ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कारवाई करण्यासाठी ध्वनी प्रदूषण नियंत्रण पथक नेमण्यात आले असून नॉईज लेव्हल मिटरद्वारे आवाजाची तीव्रता तपासून संबंधीतांविरु द्ध कारवाई करण्यात येणार आहे.
विसर्जन स्थळे :
१) भार्इंदर पश्चिमेकडील खाडीसह मांदली, राव, मुर्धा, राई व मोर्वा तलाव, उत्तन परिसरासाठी नवी खाडी २) भार्इंदर पूर्वेस जेसलपार्क चौपाटी, गोडदेव, नवघर तलाव ३) काशिमिरा येथे जरीमरी, सुकाळा, एमआयडीसी तलाव, घोडबंदर येथे चेना नदी, काजूपाडा खदान, रेतीबंदर, संक्रमण शिबिराजवळील तलाव ४) मीरारोड येथे शिवार गार्डन तलावात विसर्जनाची सोय केली असून प्रत्येक ठिकाणी विसर्जनासाठी विशेष मनुष्यबळ नियुक्त केले आहे.
पोलिसांच्या सहकार्यासाठी यंदा प्रथमच मुस्लिम समाजातील १०० स्वयंसेवक घेण्यात आले असून त्यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेचे १५०, राष्ट्रीय छात्र सेनेचे ६० व इतर सामाजिक संस्थांचे २०० स्वयंसेवकांना सहभागी करुन घेण्यात आले आहे.
विसर्जनसाठी भार्इंदर पश्चिमेकडील भार्इंदर पोलीस ठाणे ते खाडी पर्यंतचा मुख्यमार्ग व भार्इंदर पश्चिमेकडील गोल्डन नेस्ट वाहतूक बेट ते फाटक मार्गे स्टेशन रोड व जेसलपार्क चौपाटी दरम्यानच्या मुख्यमार्गावर रिक्षा, बस आदी सार्वजनिक वाहनांना सायंकाळी ४ ते रात्री १०.३० वा. पर्यंत तात्पुरती बंदी घातली आहे.
पालिकेनेही सुमारे ४०० अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून महत्त्वांच्या विसर्जनस्थळी रुग्णवाहिकांसह डॉक्टर्स, परिचारिका, आवश्यक औषधांचा साठा, अग्निशमन दलांच्या गाड्या व जवान सज्ज ठेवले आहेत. उर्वरीत ठिकाणी डॉक्टरांसह परिचारिका व कर्मचाऱ्यांची नेमणूक केली
आहे.