बदलापूर पालिकेला ‘अ’ वर्ग दर्जा
By Admin | Updated: December 16, 2014 22:46 IST2014-12-16T22:45:47+5:302014-12-16T22:46:12+5:30
या शहराची लोकसंख्या ही झपाट्याने वाढलेली असतांनाही बदलापूर पालिकेला शासनाने ‘अ’ वर्गाचा दर्जा दिलेला नव्हता.

बदलापूर पालिकेला ‘अ’ वर्ग दर्जा
संकेत सबनीस, बदलापूर
या शहराची लोकसंख्या ही झपाट्याने वाढलेली असतांनाही बदलापूर पालिकेला शासनाने ‘अ’ वर्गाचा दर्जा दिलेला नव्हता. या प्रकरणी आमदार किसन कथोरे आणि बदलापूर पालिकेतील सर्व पक्षीय नगरसेवकांनी ठराव करुन शासनाकडे अ वर्ग दर्जा देण्याची मागणी केली होती. अखेर या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केल्याने आता बदलापूर पालिकेला ‘अ’ दर्जा प्राप्त झाला असून या संदर्भातील अध्यादेश लवकरच निघणार आहे.
कुळगांव-बदलापूर नगरपरिषद ही ‘ब’ वर्ग नगरपरिषद होती. त्यामुळे विषय समितीला असलेले अधिकार या पालिकेत कमी प्रमाणात होते. तसेच नव्याने कर्मचा-यांची भरती देखील करता येत नव्हती.
सर्वात जलद गतीने वाढणारे शहर म्हणून बदलापूर शहराची ओळख आहे. या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता बदलापूर पालिकेला ‘अ’ वर्ग नगरपरिषदेचा दर्जा मिळणे गरजेचे होते. तसेच २०११ च्या जनगणनेचा विचार करता बदलापूर शहराची लोकसंख्या ही १ लाख ७८ हजाराच्या वर आहे.
‘अ’ वर्ग नगरपरिपरिषदेसाठी आवश्यक असलेली १ लाख ७५ हजारांची लोकसंख्या ओलांडलेली असतांनाही शासनाने या पालिकेला ‘अ’ वर्गाचा दर्जा दिला नव्हता. आमदार किसन कथोरे यांनी बदलापूर पालिकेला लोकसंख्येच्या आधारावर आणि वाढत्या शहरीकरणाच्या आधारावर अ वर्ग दर्जा देण्याची मागणी केली होती. तसेच कुळगांव-बदलापूर नगरपरिषदेच्या वतीने राजन घोरपडे, वामन म्हात्रे आणि राम पातकर यांनी पुढाकार घेत पालिकेत ठराव करुन तो ठराव शासनाकडे पाठविला होता. मात्र या प्रस्तावावर राज्य शासनाने निर्णय न घेतल्याने आगामी पालिकेची निवडणूक ही ब वर्ग दर्जा प्रमाणेच होण्याची शक्यता निर्माण झाली होती. (प्रतिनिधी)