‘त्या’ बाबूंनी ठेकेदारांना धरले वेठीला
By Admin | Updated: October 22, 2016 03:28 IST2016-10-22T03:28:44+5:302016-10-22T03:28:44+5:30
तालुक्यातील कुडूस मंडळ विभागाचे मंडळ अधिकारी हरिश्चंद्र भरसट यांनी आपल्या नवीन कार्यालयासाठी येथील ठेकेदारांना वेठीस धरले आहे. ते जबरदस्तीने ठेकेदारांकडून बांधकाम

‘त्या’ बाबूंनी ठेकेदारांना धरले वेठीला
- वसंत भोईर, वाडा
तालुक्यातील कुडूस मंडळ विभागाचे मंडळ अधिकारी हरिश्चंद्र भरसट यांनी आपल्या नवीन कार्यालयासाठी येथील ठेकेदारांना वेठीस धरले आहे. ते जबरदस्तीने ठेकेदारांकडून बांधकाम साहित्य टाकून घेत असल्याने ठेकेदारांनी नाराजी व्यक्त होत आहे.
मंडळ अधिकारी भरसट यांचे कुडूस येथे कार्यालय आहे. या कार्यालयात ते स्वत: कुडूस तलाठी व डोंगस्ते तलाठी अशी तिघांची कार्यालये आहेत. एकाच खोलीत तिनही कार्यालये असल्याने ही जागा अपूरी पडत असल्याने भरसट यांनी आणखी एक खोली वाढवली असून तिचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामासाठी ते येथील ठेकेदारांकडून जबरदस्तीने बांधकाम साहित्य टाकायला सांगत आहेत. कुणाला दगड तर कुणाला रेती, कुणाला वीट तर कुणाला सिमेंट, कुणाला मजूरीचे पैसे असे द्यायला सांगून ते आपल्या पदाचा दुरूपयोग करीत आहेत.
शासकीय इमारती या सार्वजनिक बांधकाम विभाग अथवा जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्याकडून बांधल्या जातात. त्यांची दुरूस्ती व देखभालीची कामे ही त्यांच्या कडूनच केली जातात असे असतांनाही शासकीय नियमांची पायमल्ली करीत आपल्या पदाचा दुरूपयोग करून भरसट यांनी कार्यालयाचे काम केलेले आहे.
कुडूस परिसरात औद्योगिकीकरण वाढल्याने येथे जमिनीचे दर गगणाला भिडले आहेत. जमिनीचे व्यवहार झाल्यावर फेरफार टाकणे, ७/१२ बनविणे, जमिन बिनशेती (एन.ए) करणे तसेच या भागात मोठ्या प्रमाणात दगड खाणी असून त्यांना गौणखिनज (रायल्टी)ची परवानगी घेतली जाते ही कामे मंडळ अधिकाऱ्यामार्फत केली जातात. त्यामुळे मंडळ अधिकारी ही कामे मंडळ अधिकाऱ्यामार्फत केली जातात. त्यामुळे मंडळ अधिकारी कार्यालय म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी झाली आहे. येथे येण्यासाठी बोली लावली जाते. आर्थिक व्यवहार येथे मोठ्या प्रमाणात होत असल्याने मंडळ अधिकाऱ्यांना सुगीचे दिवस आले असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहेत. या कार्यालयात दलालांचा प्रचंड राबता दर दिवशी असतो.
दरम्यान, नियमबाह्य काम करणाऱ्या मंडळ अधिकारी यांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी मनसेचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष गोविंद पाटील यांनी तहसीलदारांकडे केली आहे. या संदर्भात मंडळ अधिकारी हरिश्चंद्र भरसट यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या बाबत बोलणे टाळले.