Attempts to burn a bike outside Umroli station | उमरोळी स्थानकाबाहेर दुचाकी जाळण्याचा प्रयत्न

उमरोळी स्थानकाबाहेर दुचाकी जाळण्याचा प्रयत्न

पालघर : उमरोळी रेल्वे स्थानकाशेजारी पार्किंग केलेली दुचाकी उचलून नेत ती दुसऱ्या ठिकाणी नेऊन जाळण्याचा प्रकार घडल्याने उमरोळी गावातील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सध्या चोरीच्या घटनांबरोबरच गुन्हेगारी कारवायांमध्ये वाढ झाली असून पालघर पोलिसांपुढे आव्हान उभे ठाकले आहे.

पडघे येथील रहिवासी अनिकेत पाटील शुक्रवारी आपली दुचाकी उमरोळी रेल्वे स्थानकाशेजारी उभी करून ते लोकलने विरारला आपल्या बहिणीच्या घरी गेले. रात्रीची गाडी पकडून ते आपल्या पत्नीसह पालघर स्थानकात ११ वाजता उतरून टेंभोडे येथील घरी झोपायला गेले. पहाटे ५.३३ ची लोकल पकडून त्यांनी उमरोळी स्टेशन गाठले आणि उभी केलेली दुचाकी शोधत होते. ती जागी नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी आजूबाजूला शोध घेतला असता काही अंतरावर त्यांची दुचाकी जळत असल्याचे पाहिले.

पाटील हे बांधकाम व्यवसायात असून एका निवासी संकुलाच्या व्यवहारावरून एका व्यक्तीने त्यांच्या दुचाकीची चावी जबरदस्तीने काढून घेऊन गेल्याची घटना घडल्याची माहिती पुढे येत आहे. बनावट चावीने ती दुचाकी चोरून काही अंतरावर ती जाळण्यात आली. या प्रकरणी पालघर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Attempts to burn a bike outside Umroli station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.