पालकांचे छत्र हरपलेल्या कुटुंबाला युवकांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 22:44 IST2019-11-18T22:44:26+5:302019-11-18T22:44:32+5:30

आजी हाकते कुटुंबाचा रहाटगाडा; सामाजिक बांधीलकी जपत मदतीचे आवाहन

Assistance of youths to a family lost to their parents | पालकांचे छत्र हरपलेल्या कुटुंबाला युवकांची मदत

पालकांचे छत्र हरपलेल्या कुटुंबाला युवकांची मदत

डहाणू/बोर्डी : तालुक्यातील आदिवासीबहुल जांबूगावात कवटेपाड्यावर राहणाऱ्या कोठारी कुटुंबातील कर्त्या पुरूषाच्या निधनामुळे त्यांची पाच मुले आणि आजीच्या वाट्याला हालाखीचे जीवन आले आहे. या निराधार कुटुंबाची रोजची परवड पाहून सामाजिक बांधिलकी जपत युवा कार्यकर्ते त्यांच्या मदतीला धावले असून त्यांनी या कुटुंबाला जीवनावश्यक वस्तू तसेच कपड्यांची भेट दिली.

कवटेपाड्यातील रडकू गणू कोठारी या महिलेचा अडीच वर्षांपूर्वी सर्पदंशाने मृत्यू झाला. तर दोनच महिन्यांपूर्वी तिचा पती गणू बारक्या कोठारी यांचेही निधन झाले. एका पाठोपाठ घरातील दोन्ही कर्ती माणसे गेल्याने त्यांच्या पाच मुलांच्या डोक्यावरून पालकांचे छत्र हरपले. त्यामुळे मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी त्यांच्या आजीवर आली आहे. ही आजी मोलमजुरी करून ही जबाबदारी पार पाडते आहे. थोरली दोन मुले मोलमजुरी करून आजीला मदत करत आहेत. तुषार वडालीया यांच्या प्रयत्नाने बोर्डी ग्रा.पं.चे युवा सदस्य सौमिल राऊत, एस.आर. ग्रुप यांनी या कुटुंबास जीवनावश्यक वस्तू तसेच कपडे देऊन मदत केली आहे.

या आदिवासी कुटुंबियांची हृदय हेलावणारी स्थिती पाहता कायमस्वरूपी भरघोस मदत अपेक्षित आहे. मात्र आम्ही खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे येणे आवश्यक आहे.
-सौमिल राऊत
(सदस्य, ग्रामपंचायत बोर्डी)

Web Title: Assistance of youths to a family lost to their parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.