जव्हार प्रकल्पातील आश्रमशाळांची दुर्दशा कायम!
By Admin | Updated: April 6, 2016 01:52 IST2016-04-06T01:52:33+5:302016-04-06T01:52:33+5:30
वर्गखोल्याची कमतरता, शौचालयाची वानवा, निकृष्ट जेवण तर याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष हे चित्र आहे जव्हार, मोखाडा व विक्रमगड येथील जव्हार प्रकल्प कार्यालयामार्फत चालणाऱ्या आश्रमशाळांचे

जव्हार प्रकल्पातील आश्रमशाळांची दुर्दशा कायम!
रविंद्र साळवे, मोखाडा
मोखाडा : वर्गखोल्याची कमतरता, शौचालयाची वानवा, निकृष्ट जेवण तर याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष हे चित्र आहे जव्हार, मोखाडा व विक्रमगड येथील जव्हार प्रकल्प कार्यालयामार्फत चालणाऱ्या आश्रमशाळांचे. नुकताच जव्हारमधील २६ विद्यार्थ्यांवर पाचगणीच्या आश्रमशाळेत झालेला अन्याय उघड झाल्याने आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या वास्तवाकडे सर्वांचेच लक्ष वेधले गेले. यापूर्वीही कॅग व टाटा इन्स्टीट्यूट आॅफ सोशल स्टडिजने जव्हार प्रकल्पांतर्गत येणाऱ्या निवासी शिक्षणाचा भांडाफोड केला होता हे विशेष!
जव्हार आश्रमशाळा प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत ३० आश्रमशाळा चालवल्या जात आहेत. यामध्ये ९ हजार ४८२ मुले व ८ हजार ६८७ मुली एकूण १८हजार ६८७ शिक्षण घेत आहेत. परंतु या आश्रमशाळामध्ये शौचालय आणि बाथरूमचा फक्त डोलाराच उभा आहे. प्रत्यक्षात आंघोळ व शौचविधी उघड्यावर होत आहेत. पैकी अनेक आश्रमशाळेना खोल्याची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांना जेवण, झोपणे आणि शिक्षण एकाच खोलीत घ्यावे लागत आहे. तसेच अनेक आश्रमशाळांमध्ये घाणीचे साम्राज्य व कोंदट वास यामुळे मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यातच आश्रमशाळेतील अधिक्षक व अधिक्षिका याची २८ रिक्तपदे अजून न भरल्याने अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा बोजा आहे. याबाबत अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी बाबासाहेब पारधे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
पिण्यासाठी अशुद्ध पाणी, आश्रमशाळेत प्रयोगशाळा व संगणकाचा आभाव, नादुरस्त पंखे, रात्रीचा विजेचा लपंडाव व आरोग्य तपासणीचा आभाव हे येथील शिक्षणाचे वास्तव आहे. दुर्गम भागात नियमित तपासणी होत नसल्याने व्यवस्थापकांची मनमानी या सर्व प्रकारामुळे गत पाच वर्षात ५७ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. अनेक आश्रमशाळा, दुरावस्थेत खितपत पडल्या आहेत. या प्रकल्पाच्या अंतर्गत १६ आश्रमशाळाचे बांधकाम अपूर्ण अवस्थेत असून घानवळ येथील आश्रमशाळा आजही भाड्याच्या घरात भरत आहेत. तसेच शिक्षकांनी निवासी थांबणे बंधनकारक असून अनेक आश्रमशाळेतील शिक्षक निवासी थांबत नाही. (वार्ताहर)