एसटीच्या फेऱ्या रद्द केल्याबाबत उत्तर द्या!
By Admin | Updated: March 26, 2017 03:15 IST2017-03-26T03:15:26+5:302017-03-26T03:15:26+5:30
वसई-विरार व नालासोपाराच्या हद्दीतून एसटीच्या फेऱ्या रद्द केल्या, तर विद्यार्थ्यांना त्रास होईल, असे म्हणत उच्च न्यायालयाने

एसटीच्या फेऱ्या रद्द केल्याबाबत उत्तर द्या!
मुंबई: वसई-विरार व नालासोपाराच्या हद्दीतून एसटीच्या फेऱ्या रद्द केल्या, तर विद्यार्थ्यांना त्रास होईल, असे म्हणत उच्च न्यायालयाने २९ मार्चपर्यंत एसटी व वसई-विरार महापालिकेला याबाबत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.
१ एप्रिलपासून वसई-विरार व नालासोपारामध्ये एसटीची सेवा रद्द करण्यात येणार असल्याने, शॅरियन डाबरे या १२ वर्षांच्या विद्यार्थ्याने व त्याच्या एका शिक्षिकेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर होती.
शॅरियन भुईगावात राहातो. त्याचे घर ते शाळा पायी सुमारे दीड तासाचे अंतर आहे. या भागात एसटीची बस सकाळी साडेसहा वाजता येते. ही बस पकडून शॅरियन व अन्य विद्यार्थी भुईगावापासून सहा कि.मी. दूर असलेल्या सेंट अॅन्थनी कॉन्वेंट शाळेत सकाळी ७:१० वाजता पोहोचतात. एप्रिल महिन्यात एसटीची सेवा रद्द झाल्यास, या विद्यार्थ्यांना एवढ्या सकाळी शाळेत जाण्यासाठी अन्य कोणतीच सुविधा नाही. सप्टेंबरमध्ये एसटीने वसई-विरार महापालिकेच्या हद्दीतून बस सेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला. याची माहितीही महापालिकेला दिली, तसेच त्यांना महापालिकेची बससेवा सुरू करण्यास सांगितले. मात्र, वसई-विरार महापालिकेने याबाबत अद्याप काहीच निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने २९ मार्चपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)
मुलांना त्रास नको
परीक्षा जवळ आल्यामुळे एसटीच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना त्रास होईल, असे खंडपीठाने म्हटले. वसई-विरार व नालासोपारा या ठिकाणी एकूण ८० मार्ग आहेत. त्यापैकी ५२ मार्गावरून वसई-विरार महापालिकेच्या बसेस धावतात. मात्र, २८ मार्गांना एसटी सेवा पुरविते. मात्र, आता एसटीही तोट्यात असल्याने, १ एप्रिलपासून या २८ मार्गांवरून फेऱ्या बंद करण्याचा निर्णय एसटीने घेतला आहे.