संतप्त मच्छीमारांनी बार्जला पिटाळले
By Admin | Updated: March 17, 2016 02:39 IST2016-03-17T02:39:21+5:302016-03-17T02:39:21+5:30
तारापूरच्या औद्योगिक वसाहतीमधून प्रदुषीत रासायनिक सांडपाण्याचे पाईप नवापूर गावाच्या समोरील समुद्रात ७.१ कि. मी. अंतरावर टाकण्याच्या कामासाठी आलेल्या एमटीसी टाईड

संतप्त मच्छीमारांनी बार्जला पिटाळले
- हितेन नाईक, पालघर
तारापूरच्या औद्योगिक वसाहतीमधून प्रदुषीत रासायनिक सांडपाण्याचे पाईप नवापूर गावाच्या समोरील समुद्रात ७.१ कि. मी. अंतरावर टाकण्याच्या कामासाठी आलेल्या एमटीसी टाईड या कंपनीच्या बार्जला दांडी गावातील मच्छीमारांच्या बोटीनी समुद्रात घेराव घातला. आणि त्यांना पिटाळून लावले. यावेळी मोठ्या संख्येने महिलाही समुद्रात गेल्या होत्या.
तारापुरच्या औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यामधून बाहेर निघणारे प्रदूषित रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून (सीईटीपी) नवापूर गावातून पाईप लाईनद्वारे समुद्रात सोडले जात होते. या मागील चाळीस वर्षापासून टाकण्यात आलेल्या पाईपलाईन जुनाट व नादुरूस्त झाल्याने एमआयडीसीने ही जुनाट पाईपलाईन बदलून त्या जागी नवीन एचडीपीई पाईप लाईन समुद्रात ७.१ कि. मी. अंतरावर टाकण्याचे काम हाती घेतले होते. याद्वारे समुद्रात सोडण्यात येणाऱ्या प्रदूषित पाण्यामुळे मच्छीमारीचा गोल्डन बेल्ट म्हणून ओळखला जाणारा मत्स्य संपदेचा भाग नष्ट होणार असल्याने मच्छीमारांचा या कामाला विरोध होता. नवापूर ग्रामपंचायतीने लाखो रू. चा विकास निधी स्वीकारून आपल्या गावातून या पाईपलाईन टाकण्यास परवानगी दिल्याने किनारपट्टीवरील मच्छीमार गावामधून संतप्त प्रतिक्रीया उमटत होत्या. दि. २७ फेब्रुवारी रोजी उच्छेळी-दांडी येथील शेकडो पुरूष महिलांनी नवापूर गावासमोरील समुद्रावर पाईपलाईन टाकण्याचे काम बंद पाडले होते. यावेळी नवापूर व उच्छेळी-दांडीच्या ग्रामस्थांमध्ये जोरदार वादावादी झाली होती. तर या प्रदूषित पाण्याच्या पाईपलाईनमुळे भविष्यात निर्माण होणारे पर्यावरणाचे दुष्यपरीणाम पाहता हे काम बंद करण्यासाठी अनेक अर्ज विनंत्या करूनही हे काम थांबत नसल्याने काही अज्ञात व्यक्तींनी पाम येथे रस्त्यावर टाकलेले पाईप पेटवून दिले असावेत अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. सातपाटी सागरी पो. स्टे. मध्येही अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या मच्छीमार किनारपट्टीवर जिंदाल, वाढवण हे बंदर प्रकल्प स्थानिकांवर लादले जात असतांना एमआयडीसीमधून थेट समुद्रात प्रदूषित पाण्याची पाईपलाईन सोडल्याने आधीच मत्स्य दुष्काळाच्या खाईत होरपळत असलेल्या मच्छीमारांचा व्यवसाय संपुष्टात येईल.
त्यामुळे मच्छीमार संतप्त झाला असून आज नवापूर गावासमोरील समुद्रात अंधेरी येथील एमटीसी टाईड या कंपनीचा बार्ज पाईप टाकण्याचे काम हाती घेत असल्याचे कळल्यानंतर उच्छेळी-दांडीच्या मच्छीमारांनी आपापल्या बोटी थेट समुद्रात नेल्या.
सुधीर तामोरे, विजय तामोरे, विद्याधर केणी, राजीव पागधरे, रोहीदास तामोरे, इ. सह रणरागिणी बनलेल्या संगीता अक्रे इ. व शेकडो महिलांनी या बार्जला पिटाळून लावले.