घाणेरड्या परिवहन सेवेने नाराज
By Admin | Updated: August 26, 2015 23:50 IST2015-08-26T23:50:30+5:302015-08-26T23:50:30+5:30
वसई-विरार शहर महानगरपालिकेने आपल्या हद्दीत परिवहन सेवा सुरू केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला खरा, परंतु सेवेत असलेल्या वाहनांच्या स्वच्छतेकडे तिचे

घाणेरड्या परिवहन सेवेने नाराज
वसई : वसई-विरार शहर महानगरपालिकेने आपल्या हद्दीत परिवहन सेवा सुरू केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला खरा, परंतु सेवेत असलेल्या वाहनांच्या स्वच्छतेकडे तिचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे प्रवासीवर्गात प्रचंड नाराजी आहे. परिवहन सेवेकडे अद्याप आगारासाठी जागा नसल्यामुळे वाहनांची निगा राखणे ठेकेदाराला शक्य होत नाही. याबाबत, महानगरपालिकेने लक्ष घालावे अशी प्रवासीवर्गाकडून अपेक्षा व्यक्त होत आहे.
रिक्षाचालकांच्या मनमानीमुळे त्रस्त झालेल्या प्रवासीवर्गाला महानगरपालिकेच्या परिवहन सेवेने चांगलाच दिलासा दिला. मात्र, अस्वच्छ व घाणेरड्या गाड्यांमुळे शाळा-कॉलेज तसेच कार्यालयांत जाणाऱ्यांचे अनेक वेळा कपडे खराब होतात. सध्या या परिवहन सेवेच्या ताफ्यात सुमारे १०० ते १५० बसेस आहेत. परंतु या बसेसची निगा राखणे, स्वच्छता करणे, बसेस धुणे आदींसाठी लागणाऱ्या आगाराची कमतरता आहे. त्यामुळे परिवहन सेवेच्या बसेस रस्त्यावरच उभ्या करण्यात येतात. अनेक बसेसना गेल्या काही
महिन्यात धुतलेल्याच नाहीत.
या अस्वच्छतेमुळे प्रवासीवर्गामध्ये नाराजीचे वातावरण आहे. परिवहन सेवेने तिकिटाच्या दरात वाढ केली तरी प्रवाशांनी त्यास संमती दिली, परंतु बसेसमधील अस्वच्छतेमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ही दुरावस्था संपणार कधी असा सवाल प्रवासी करीत आहेत.
(प्रतिनिधी)