बिघडलेल्या तरुणांच्या डोळ्यांत घातले अंजन
By Admin | Updated: January 5, 2016 00:55 IST2016-01-05T00:55:05+5:302016-01-05T00:55:05+5:30
आताच्या तरुणींना ‘व्हॅलेंटाइन डे’ची तारीख पाठ असते. या दिवशी कुणाला गुलाबाचे फुल द्यावे आणि कुणाला देऊ नये, हे चांगलेच कळते.

बिघडलेल्या तरुणांच्या डोळ्यांत घातले अंजन
वाडा : आताच्या तरुणींना ‘व्हॅलेंटाइन डे’ची तारीख पाठ असते. या दिवशी कुणाला गुलाबाचे फुल द्यावे आणि कुणाला देऊ नये, हे चांगलेच कळते. मात्र, सावित्रीबाई फुलेंची जन्मतारीख कुणाच्या लक्षात राहत नाही. मुलींसाठी ज्ञानाची कवाडे उघडी करणाऱ्या व ज्या मातेमुळे आपण भरारी घेतली, तिचा जन्म दिवस आताच्या तरुणींना माहीत नसणे, हे दु:खदायक असल्याचे सांगून सहायक पोलीस निरीक्षक चित्रा मढवी यांनी आजच्या पिढीच्या डोळ्यांत जळजळीत अंजन भरले. त्या घोणसई येथे बोलत होत्या.
वाडा तालुक्यातील घोणसई येथे एक आवाज सेवाभावी संस्थेच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे आयोजन रविवारी (दि. ३) केले होते. त्या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी घोणसईच्या सरपंच अश्विनी घोरकणे या होत्या. तर, प्रमुख पाहुण्या म्हणून पंचायत समिती सदस्या मेघना पाटील होत्या. चित्रा मढवी पुढे म्हणाल्या की, समाजामध्ये असलेल्या अनिष्ट रूढी व परंपरा बंद करा आणि त्या बंद केल्यानेच सावित्रीबाई फुलेंना खरी आदरांजली ठरू शकेल. त्या पुढे म्हणाल्या, आई ही मुलीची खरी मैत्रीण असली पाहिजे. मात्र, हल्ली आईपेक्षा मैत्रीण तिला जवळची वाटते. कारण, ‘सेटिंग’ लावण्याचे काम ती करत असते, अशी टीका करून मैत्रिणींमुळे अनेक प्रश्न उद्भवतात, त्यामुळे सावध राहण्याचा सल्ला त्यांनी दिला.
या वेळी राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त वैशाली पाटील (आरोग्य), चित्रा मढवी (पोलीस), रश्मी पाटील (पत्रकार), श्रीमती शकिला (गृहिणी), ऐश्वर्या पाटील (कुस्तीपटू), वैष्णवी पाडेकर (गायक) या महिलांचा ‘सावित्रीच्या लेकी’ या पुरस्काराने गौरव करण्यात आला. (वार्ताहर)