All Covid Center Housefull in rural areas of the district | जिल्ह्याच्या ग्रामीण भागांतील सर्व कोविड सेंटर हाऊसफुल्ल

जिल्ह्याच्या ग्रामीण भागांतील सर्व कोविड सेंटर हाऊसफुल्ललोकमत न्यूज नेटवर्क 
विक्रमगड : पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत असून त्याचा उपलब्ध आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण वाढला आहे. सद्यस्थितीत रिवेरा सेंटरमधील अतिदक्षता (आयसीयू) बेड फुल झाले असून ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्याने रुग्णांचा मृत्यू होण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. या सेंटरमध्ये २५० कोरोना रुग्ण क्षमता असून २९४ रुग्ण सध्या तेथे दाखल आहेत, तर गेल्या १ एप्रिलपासून ३४ कोरोना रुग्णांचा या रुग्णालयात मृत्यू झाला आहे.
रिवेरा हाॅस्पिटल या कोरोनाबाधितांसाठी २५० क्षमता असलेल्या रुग्णालयात सध्या २९४ कोरोना रुग्ण दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, तर अतिदक्षता बेडची संख्या ५० ची आहे, मात्र रुग्णसंख्या रोजच वाढत असल्याने येथील ऑक्सिजन बेड फुल झाले आहेत, अशी माहिती रिवेरा हॉस्पिटलचे नोडल ऑफिसर डॉ. प्रशांत राजगुरू यांनी दिली.
जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत असून येणाऱ्या रुग्णांना वेळेत ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. गेल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. दुसरीकडे २५० रुग्ण क्षमता असलेल्या रुग्णालयात कर्मचारी संख्या कमी असून नर्स, डॉक्टर्स, वॉर्डबॉय, लॅब टेक्निशियन, पॅरा मेडिकल स्टाफ यांची तातडीने संख्या वाढविण्याची आवश्यकता आहे.
रिवेरा सेंटर हे येथील आठ तालुक्यांसाठी जिल्हा सेंटर आहे, मात्र या सेंटरमध्ये अपुरा कर्मचारीवर्ग, अपुरी क्षमता व योग्य नियोजनाचा अभाव दिसत असल्याने रुग्णांची व नातेवाईकांची फरफट होत आहे. काहींना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. उपलब्ध कर्मचारीवर्ग आपल्या जीवाची पर्वा न करता काम करीत असले तरी त्यांच्यावर कामाचा अतिरक्त ताण पडत असल्याने तेही अपुरे पडत आहेत. जिल्हा रुग्णालय म्हणून शासनाचे या विभागाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. तरी शासनाने या जिल्हा सेंटरकडे गांभीर्याने पाहून येथे सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून रिव्हेरा हॉस्पिटलमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या १ तारखेपासून ३४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून अतिदक्षता बेड फुल झाले आहेत, तर २९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
- डॉ. प्रशांत राजगुरू, नोडल ऑफिसर, 
रिव्हेरा हॉस्पिटल

Web Title: All Covid Center Housefull in rural areas of the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.