डहाणूत रेशनिंगचा ठणठणाट
By Admin | Updated: September 7, 2015 03:45 IST2015-09-07T03:45:00+5:302015-09-07T03:45:00+5:30
डहाणू तालुक्यातील दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या आदिवासींच्या कारवीच्या झोपडीतील चूल पेटते ती रास्तभाव दुकानातून मिळणाऱ्या धान्याच्या भरवशावर.

डहाणूत रेशनिंगचा ठणठणाट
डहाणू : डहाणू तालुक्यातील दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या आदिवासींच्या कारवीच्या झोपडीतील चूल पेटते ती रास्तभाव दुकानातून मिळणाऱ्या धान्याच्या भरवशावर. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून तांदूळ, गहू, तेल, साखर मिळाले नसल्याने येथील घरोघरी उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून कुपोषणाच्या प्रमाणात देखील वाढ झाली आहे. शिवाय या भागातील केशरी कार्डधारकांना गत नऊ महिन्यांपासून रेशनचे धान्य मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
ज्या बचतगटांकडे या दुकानाचे परवाने आहेत. त्यांनी धान्य व रॉकेल मिळण्यासाठी लागणारे पैसे भरल्यानंतरही हा पुरवठा होत नसल्याने त्यांनी मोर्चा काढण्याचा इशारा डहाणूच्या तहसीलदारांना यांना दिले आहे. शासनाने गेल्या सहा महिन्यापासून रेशनीगवरील धान्य कमी केल्याने अतिदुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी मेटाकुटीला आला आहे.
विशेष म्हणजे डहाणूतील महिला बचत गट परवाने धारकांनी धान्य उचलण्यासाठी पुरवठा शाखेत जून, जुलै, आॅगस्ट असे तीन महिन्याचे पैसे भरले आहेत. परंतु बोरीवली, भिवंडीच्या एफ.सी.आय. गोडाऊन मधून डहाणूत पुरेशा प्रमाणात धान्यपुरवठा होत नसल्याने रास्तभाव दुकान चालविणारे महिला बचत गट हवालदिल झाले आहे. जर धान्य गोदामात नसेल तर पैशांचा भरणा करण्याचा अट्टाहास का असा सवाल रेशन दुकानदारांचा आहे. त्यामुळे डहाणू तालुक्यातील रास्तभाव तसेच किरकोळ रॉकेल परवानेधारकांनी मोर्चा, धरणे आंदोलन करण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे डहाणूच्या तहसीलदार प्रितीलता कौरथी यांना दिला आहे. (वार्ताहर)