आदिवासी विद्यार्थ्याचा गेला प्रशासनाच्या बेफिकिरीने बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 23:42 IST2019-07-10T23:42:33+5:302019-07-10T23:42:37+5:30
हेळसांड खपवून घेणार नाही : राज्यस्तरीय आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडित संतप्त

आदिवासी विद्यार्थ्याचा गेला प्रशासनाच्या बेफिकिरीने बळी
जव्हार : विक्र मगड तालुक्यातील विक्र मशाह वसतिगृहात झालेल्या आदिवासी विद्यार्थी मृत्यू प्रकरणी मंगळवारी राज्यस्तरीय आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडित यांनी वसतिगृहाला भेट दिली. येथील व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा आणि कोंडवाड्यासारखी परिस्थिती पाहून पंडित यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. येथे इयत्ता सातवीत शिकणाऱ्या अनंता तुळशीराम वायड या तेरा वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणी पंडित यांनी येथील बेफिकीर व्यवस्थापनावर चांगलेच ताशेरे ओढले. आदिवासी विद्यार्थ्यांची अशी हेळसांड खपवून घेणार नाही, असे सांगून तातडीने येथील सर्व विद्यार्थी जवळच्या शासकीय आश्रमशाळेत दाखल करावेत, असे आदेश यावेळी पंडित यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना दिले. यावेळी पंडित यांनी मयत बालकाच्या वडिलांशीही चर्चा करून आस्थेने विचारपूस केली.
जव्हार येथील अनंता वायडच्या कुटुंबाला भेट देऊन आल्यानंतर पंडित यांनी विक्रमगड तालुक्यातील विक्रमशहा वसतिगृहाला भेट दिली. त्या वसतिगृहातच तो मरण पावला होता. त्याची प्रकृती रात्री एक वाजता बिघडली होती. परंतु तिथल्या अधिकाºयांनी दुर्लक्ष केले. पहाटे तीन वाजेपर्यंत तो अत्यवस्थ झाला तेव्हा त्याला उपचारासाठी तेथून ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे पोहचल्यावर अवघ्या पाच मिनिटात त्या विद्यार्थ्याने प्राण सोडले. डॉकटरांचा असा अंदाज आहे की त्याला सर्प दंश झालेला असावा, पण येथील कोंडवाड्यासारखी व्यवस्था, निकृष्ट भोजन आणि आदिवासींबाबतीत येथील व्यवस्थापनाची संवेदनशून्य भूमिका या मृत्यूस कारणीभूत असल्याचे त्यांना दिसले.
या वसतिगृहाचे दरवाजे मोडलेल्या अवस्थेत होते. मुली राहत असलेल्या रुम्सच्या खिडक्यांना झडपा नाहीत, स्नानगृहे, शौचालये मोडलेल्या अवस्थेत आहेत.
ज्या ठिकाणी मुलांचे निवासस्थान आहे तिथे अकराशे चौरस फूट जागा आवश्यक आहे तेथे केवळ सातशे चौरस फूट जागा आहे, यामध्ये ४५ मुल खुराड्यात ठेवल्यागत राहतात, शौचालयाकडे जाणाºया रस्त्यावर लाईट्स नाहीत. जनरेटर व इनव्हर्टर बंद पडलेले आहेत. बाहेरचा व मागचा व्हरांडा गोठ्याप्रमाणे आहे. मुलांची जेवणाची व्यवस्था अतिशय घाणेरड्या पध्दतीची होती. त्या वसतिगृहात असणारे ४५ मुले व ३५ मुली शिक्षणासाठी अतिशय बिकट वातावरणात राहत आहेत. एकूण ८० आदिवासी विद्यार्थी या वसतिगृहात कोंडवाड्याप्रमाणे जीवन जगत आहेत.
हे वसतिगृह चालवणारी संस्था सरकारकडून लाखोंचे अनुदान घेते ेआहे. मात्र त्या तुलनेने आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणाºया सुविधा देत नाहीत हे पाहून पंडित यांनी संताप व्यक्त केला.
यानंतर पंडित यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट दिली. यावेळी एकही आश्रमशाळा किंवा वसतिगृहाच्या विद्यार्थ्याच्या आरोग्याकडे दुर्लक्ष चालणार नाही, असे स्पष्ट ताकीद पंडित यांनी दिली. या विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
येथील शासकीय वसतिगृहाच्या बांधकामात वन विभागाच्या परवानगीच्या अडचणीबाबत तातडीने वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांना प्रस्ताव देण्याचे निर्देश प्रकल्प अधिकाºयांना देऊन आपण स्वत: त्याचा पाठपुरावा करु असे पंडित यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांचे समायोजन
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली, पालघर जिल्हा सल्लागार दामू मौळे यांनी यावेळेस वसतिगृहात राहत असलेल्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना जवळील रिक्त आश्रम शाळेत समायोजित करण्यात येईल. आणि काहीच दिवसात मुलांचे समायोजन करून हे वसतिगृह बंद करण्यात यावे, यासाठी पंडित पुढील कारवाई करणार आहेत. यावेळी प्रकल्प कार्यालय, जव्हारचे आनिल सोनावणे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण व परिषदेचे विक्र मगड तालुकाध्यक्ष लहू नडगे व वाडा सचिव दशरथ महाले व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.