समेळपाड्यातील अनधिकृत इमारतीला अभय?
By Admin | Updated: February 13, 2017 04:47 IST2017-02-13T04:47:43+5:302017-02-13T04:47:43+5:30
रहिवाशांना बेघर करु पाहणाऱ्या अनधिकृत इमारतीवर कारवाई करण्याचा आयुक्तांचा आदेश बिल्डरला अभय देण्यासाठीच नालासोपाऱ्यातील सहाय्यक

समेळपाड्यातील अनधिकृत इमारतीला अभय?
वसई : रहिवाशांना बेघर करु पाहणाऱ्या अनधिकृत इमारतीवर कारवाई करण्याचा आयुक्तांचा आदेश बिल्डरला अभय देण्यासाठीच नालासोपाऱ्यातील सहाय्यक आयुक्ताने धुडकावून लावला आहे. याविरोधात जनआंदोलन उभारले जाणार आहे.
नालासोपारा पश्चिमेकडील समेळपाडा-लिटील फ्लॉवर शाळेच्या मागे घन्सार चाळ नावाची दुमजली इमारत होती. जुना सर्व्हे क्र.५६ आणि नवीन ११ हिस्सा क्र.६ पैकी या जागेवर असलेली ही चाळ तोडून त्यात जुन्या रहिवाशांना नवीन घरे देण्याचे आमिष बिल्डर प्रदीप सिंग याने दाखवले होते. तोपर्यंत जुन्या रहिवाशांना इतरत्र भाड्याने राहण्याची आणि त्या-त्या फ्लॅटचे भाडे देण्याचे सिंग याने मान्य केले होते. काही महिने भाडे दिल्यानंतर त्याने भाडे देण्याचे बंद केले. तसेच चार वर्षे उलटून गेल्यानंतरही त्याने जुन्या रहिवाशांना नवीन घरेही दिली नाहीत. त्यामुळे स्वत:चे घर असतानाही भाड्याच्या घरात स्वखर्चाने राहण्याची पाळी त्यांच्यावर आली आहे.
याप्रकरणी जन आंदोलन समितीचे कार्यकर्ते सुनील डिसिल्व्हा यांनी माहिती घेतली असता, धक्कादायक माहिती त्यांच्या हाती आली. बिल्डरने या चाळीवर पाचमजली दोन इमारती बांधल्या आहेत. त्यातील ‘ए’ विंंग संपूर्णता अनधिकृत असून त्यात जुन्या रहिवाशांना घरे देण्यात येणार आहे. तर बी विंंगला फक्त चार मजल्याची परवानगी देण्यात आली असतांनाही त्याने गाळे आणि पाचवा मजला अनधिकृतरित्या उभारला आहे. ‘ए’ विंंगमध्ये जुन्या रहिवाशांना घरे दिल्यानंतर ‘बी’ विंंगमधील गाळे आणि फ्लॅटचा लाभ मिळणार आहे. (प्रतिनिधी)