महापालिकेसाठी ‘आप’ची चाचपणी
By Admin | Updated: February 12, 2015 01:23 IST2015-02-12T01:03:51+5:302015-02-12T01:23:06+5:30
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आपने नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने चाचपणी सुरू केली आहे

महापालिकेसाठी ‘आप’ची चाचपणी
नवी मुंबई : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आपने नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने चाचपणी सुरू केली आहे. यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी २२ फेब्रुवारीला राज्यस्तरीय कमिटीची बैठक होणार आहे. दरम्यान, दिल्लीतील ट्रेंडचा महापालिका निवडणुकीत नक्कीच फायदा होईल, असा विश्वास आपच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे.
अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आपने दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसचा धुव्वा उडविला. या निवडणुकीत आपला मिळालेल्या यशामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी नवी मुंबईतील आपच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी शहरात रॅली काढून विजयोत्सव साजरा केला. एकूणच कार्यकर्त्यांत नवचैत्यन्य निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी पक्षाने चाचपणी सुरू केली आहे. महापालिकेच्या निवडणुका लढण्यासंदर्भात कार्यकर्त्यांची मानसिकता तयार झाली आहे. त्यानुसार महापालिकेची निवडणूक लढण्यासंदर्भातील प्रस्ताव पक्षश्रेष्ठींकडे पाठविण्यात येणार आहे. यासंदर्भात २२ फेब्रुवारीला आम आदमी पार्टीच्या राज्यस्तरीय कमिटीची बैठक असून त्यात अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पक्षाच्या महाराष्ट्र कार्यकारिणी समितीचे सदस्य सुंदर बालकृष्णन यांनी दिली. (प्रतिनिधी)