सूर्या धरणात ९३% पाणीसाठा
By Admin | Updated: November 7, 2015 00:21 IST2015-11-07T00:21:53+5:302015-11-07T00:21:53+5:30
डहाणू तसेच पालघर परिसरातील शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या धरणात ९३ टक्के पाणीसाठा असून दरवर्षीप्रमाणे यंदादेखील उन्हाळ्यात कालव्यातून शेतीला नियमित पाणीपुरवठा होणार

सूर्या धरणात ९३% पाणीसाठा
- शशिकांत ठाकूर, कासा
डहाणू तसेच पालघर परिसरातील शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या धरणात ९३ टक्के पाणीसाठा असून दरवर्षीप्रमाणे यंदादेखील उन्हाळ्यात कालव्यातून शेतीला नियमित पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती सूर्या प्रकल्प कार्यकारी अभियंत्यांना निलेश दुसाने यांनी दिली आहे. त्यामुळे कालव्याच्या पाण्यावर भातशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
यंदा पाऊस कमी झाल्याने कालव्यातून शेतीला पाणीपुरवठा होणार की नाही, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम होता. पालघर, डहाणू तालुक्यांतील सुमारे १०० गावांतील शेतकरी उन्हाळ्यात कालव्याच्या पाण्यावर भातशेती तसेच भाजीपाला लागवड आणि भुईमूग आदी पिके घेतात. वेळेवर पाऊस न झाल्याने तसेच कमी पाऊस झाल्याने जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थितीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते.
मोठ्या प्रमाणात भातशेती पाणी तसेच रोपे कमी पडल्याने ओस गेली तसेच उत्पादनही कमी झाले आहे. तसेच पावसाच्या लहरीपणामुळे भातशेतीबरोबरच पावसाळ्यात घेतल्या जाणाऱ्या इतर पिकांवरही विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात कालव्याच्या पाण्यावर शेती करून आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार मिळेल.