मोक्यातील अटक आरोपीला ६ दिवसांची पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2023 18:39 IST2023-08-21T18:38:59+5:302023-08-21T18:39:02+5:30
अटक आरोपी नायर याला १९ ऑगस्टला न्यायालयात हजर करुन सविस्तर तपास करण्याकरिता पोलीस कोठडी मागण्यात आली असता त्याला २५ ऑगस्टपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

मोक्यातील अटक आरोपीला ६ दिवसांची पोलीस कोठडी
मंगेश कराळे
नालासोपारा :- मोक्याप्रकरणी अटक आरोपी गिरीश नायर याला वसई न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
गंभीर गुन्हयातील मुख्य आरोपी गिरीश नायर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुध्द यापूर्वी मुंबई शहर, ठाणे शहर व वसई-विरारमध्ये गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याने पोलीस उपायुक्त परिमंडळ दोनच्या पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांनी सदर गुन्हयाचा सखोल तपास करुन आरोपी गिरीश नायर याच्यावर यापूर्वी दाखल असलेल्या गुन्हयांची सविस्तर माहिती गोळा करण्याबाबत नायगाव पोलीस ठाणेच्या तपास पथकाला दिले होते. त्या अनुषंगाने नायगांवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी आरोपी नायर व त्याचे साथीदारांवर दाखल असलेल्या मागील १० वर्षांतील दाखल असलेल्या ९ गुन्हयांची माहिती तपास पथकाच्या मार्फतीने गोळा करुन सदर आरोपीवर व त्याचे साथीदारांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात यावी याबाबत अप्पर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक यांना अहवाल सादर केला. त्यास मंजुरी मिळाल्याने सदर गुन्हयास मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
अटक आरोपी नायर याला १९ ऑगस्टला न्यायालयात हजर करुन सविस्तर तपास करण्याकरिता पोलीस कोठडी मागण्यात आली असता त्याला २५ ऑगस्टपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी मंजूर केली आहे. आरोपी नायर हा सराईत गुन्हेगार असून सामान्य नागरिकांमध्ये त्याच्याबद्दल दहशत असल्याने त्याच्याविरुध्द पोलीस ठाणेला कोणी सामान्य नागरिक तक्रार देण्यास धजावत नाही. त्यामुळे सदर आरोपीबाबत कोणास काहीएक सांगायचे असल्यास त्यांनी पोलीसांशी संपर्क साधावा याबाबत पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांनी जनतेला आवाहन केले आहे.