The 5th Royal Urus was celebrated in Jawar, with enthusiasm | जव्हारमध्ये ५६७ वा शाही उरूस थाटात, उत्साहात साजरा
जव्हारमध्ये ५६७ वा शाही उरूस थाटात, उत्साहात साजरा

जव्हार : शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या हजरत औलिया शाह सदरोद्दीन्न बदरोद्दिन हुसैनी चिश्ती (र.अ.) यांचा ५६७ व्या उरुसाचा कार्यक्रम शुक्र वार, शनिवार आणि रविवार या तीन दिवसांत मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.

उरूसाच्या पहिल्या दिवशी जामा मशीद येथून भव्य मिरवणूक निघाली. मशिदीपासून पाचबत्तीनाका आणि नेहरूचौकातून पुन्हा दर्ग्याकडे येऊन येऊन पवित्र संदल आणि शिरनी वाटप करण्यात आली. महोत्सवात दुसरा दिवस महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी जामा मशिदीपासून मोठ्या उत्साहात मिरवणूक निघाली. यामध्ये मुरीद आणि फकीर यांचा प्रामुख्याने समावेश होता. त्यावेळी ठिकठिकाणी चौकात रातिफ करण्यात आला. मुरीद व फकीर यांनी नानाविध प्रकार यावेळी केले. आपल्या अंगावर तलवार, खंजीरचे वार करणे, सळई वा जाड तारा खुपसणे असे थरारक प्रकार करण्यात आले. हा रातिफचा सोहळा ढोल ताशे, नगारे या वाद्यांच्या सहाय्याने मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पाचबत्तीनाका, नेहरूचौक, आणि त्यानंतर गांधीचौक आणि परत दर्गाह असा हा मिरवणुकीचा प्रवास असतो. हजरत औलिया शाह सदरोद्दीन बदरोद्दिन चिश्ती (र.अ.) यांच्या दर्ग्यावर सन्मानपूर्वक चादर चढवण्यात आली. सर्व धर्मीय लोक यावेळी सहभागी झाले होते. फुलांच्या चादरी अर्पण केल्या गेल्या. त्यानंतर उर्स कमेटीतर्फे लंगरचे आयोजन करण्यात आले होते. यात हिंदू - मुस्लिम बांधवांसाठी पूर्ण गावाला आणि पाहुण्यांना भोजन दिले गेले. या कार्यक्रमानंतर पहाटे पर्यंत चालणारा बहारदार कव्वालीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कव्वालीस लाखो चाहत्यांची हजेरी होती. यात हाजी मजीद शोला या नामी कव्वाल ने देशभक्तीवर कव्वाली गायली. त्यावेळी जव्हारमध्ये हिंदू - मुस्लिम दोन्ही समाजातील चाहत्यांनी मोठा जल्लोष केला होता.

खास करून या रात्री जव्हार बस स्थानकातही सकाळ पर्यंत जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. जव्हार आणि परिसरातील असंख्य मान्यवर मंडळी तसेच आदिवासी बांधवही कव्वालीच्या कार्यक्र मास आवर्जून उपस्थित होते.

तिसऱ्या दिवशी सायंकाळी ख्वाजापिर यांचा संदल वाटपाचा आणि झेंडा फलक कार्यक्रम राजे मेहेंद्रसिंग मुकणे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी हजारो नागरिक उपस्थित होते. असा हा हजरत औलिया पीर शाह सदरोद्दिन बदरोद्दिन चिश्ती (र.अ.) यांचा उरूस दरवर्षी हिंदू मुस्लिम बांधवांनी एकोप्याने हा उरूस महोत्सव साजरा केला.

दरवर्षीप्रमाणे पूर्ण गाव तसेच एस. टी. स्टॅन्डजवळील परिसर गजबजलेला होता. आकाशपाळणे, वेगवेगळे खेळ, मौत का कुआ प्रदर्शन, विविध प्रकारचे स्टॉल, खेळण्यांची दुकाने मोठ्या संख्येने असतात. बरीचशी मंडळी बाहेरगावाहून खास या उरूसासाठी उपस्थित होते. हा शाही उरूस म्हणजे जव्हारच्या इतिहासातले एक महत्त्वाचे पान आहे. राजेशाही नसली तरी आजही ही परंपरा हिंदू मुस्लिम बांधव एकोप्याने पाळत असल्यानेच जव्हारच्या उरूसला ही आगळी वेगळी शान आहे. यावेळी पोलिसांचाही चोख बंदोबस्त होता. या कार्यक्रमाला खा. राजेंद्र गावित देखील उपस्थित होते.

कव्वालीला आदिवासी आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित, आदिवासी विकास महामंडळाचे संचालक सुनील भुसारा, राज्य चर्मकार समिती सदस्य विनीत मुकणे, विक्रमगड नगर पंचयतीचे उपनगराध्यक्ष पिंका पडवळे, सुन्नी जाम मशिदीचे सय्यद खलील कोतवाल व परिसरतील शेकडो नागरिक उपस्थित होते.
-जावेद मो. शफी पठान, अध्यक्ष,
उर्स जलसा कमेटी, जव्हार


Web Title: The 5th Royal Urus was celebrated in Jawar, with enthusiasm
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.