५० टन धान्याची विक्री
By Admin | Updated: May 16, 2017 00:46 IST2017-05-16T00:46:30+5:302017-05-16T00:46:30+5:30
ठाण्यात विविध ठिकाणी १० दिवस आयोजित करण्यात आलेल्या धान्य महोत्सवाला ठाणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला असून या संपूर्ण महोत्सवात तब्बल

५० टन धान्याची विक्री
लोकमत न्यूज ब्युरो
ठाणे : ठाण्यात विविध ठिकाणी १० दिवस आयोजित करण्यात आलेल्या धान्य महोत्सवाला ठाणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला असून या संपूर्ण महोत्सवात तब्बल ५० टन धान्याची विक्री झाली. या महोत्सवात सेंद्रिय तूरडाळीबरोबरच तांदळाची मोठ्या प्रमाणात विक्री झाली, अशी माहिती आयोजकांनी दिली.
‘नाम फाउंडेशन’ आणि ‘संस्कार’ संस्थेमार्फत हा महोत्सव आयोजित केला होता. हिंगोली, बीड, जालना या जिल्ह्यांतून ३५० शेतकऱ्यांनी आपले धान्य येथे आणले होते. या शेतकऱ्यांचे २५ प्रतिनिधी महोत्सवात सहभागी झाले. यात सेंद्रिय पद्धतीची ज्वारी, तूरडाळ, गहू, हरभरा, उडीद, बाजरी, हळद, चणाडाळ, मसाले, इंद्रायणी तांदूळ, बासमती तांदूळ, मूगडाळ, उडीदडाळ यांचा समावेश होता. १ मे ते ४ मे या कालावधीत गावदेवी मैदान येथे झालेल्या महोत्सवात २५ टन धान्याची विक्री झाली, तर आर्थिक उलाढाल जवळपास १२ लाखांची होती. त्यानंतर, ६ ते १० मे या कालावधीत माझी आई शाळा, पातलीपाडा येथे ९ टन धान्याची विक्री झाली, तर पाच ते सहा लाखांची उलाढाल झाली.
ठाणेकरांच्या वाढत्या मागणीनुसार गावदेवी मैदानात ९ व १० मे रोजी पुन्हा धान्याचे स्टॉल्स लावण्यात आले, तर ११ व १२ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात हा महोत्सव भरवण्यात आला. शेवटच्या दिवसात १० टन धान्याची, तर संपूर्ण महोत्सवात ५० टन धान्याची विक्री झाल्याचे ‘संस्कार’ संस्थेचे आ. संजय केळकर यांनी सांगितले. धान्य महोत्सवाचे आयोजन महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात झाले पाहिजे आणि त्याकरिता इतर संस्थांनीही पुढाकार घेतला पाहिजे. अशी भावना शिवराम घोडके यांनी व्यक्त केली.