१२ हजार मजुरांचे ५ कोटी थकीत
By Admin | Updated: April 1, 2016 03:20 IST2016-04-01T03:20:41+5:302016-04-01T03:20:41+5:30
पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड तालुक्यातील रोहयोवरच्या सुमारे १२ हजार मजूरांना गेले तीन महिने मजूरी मिळालेली नसून तिची थकबाकी ५ कोटीच्या आसपास

१२ हजार मजुरांचे ५ कोटी थकीत
पालघर/वसई : पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड तालुक्यातील रोहयोवरच्या सुमारे १२ हजार मजूरांना गेले तीन महिने मजूरी मिळालेली नसून तिची थकबाकी ५ कोटीच्या आसपास आहे. ती तातडीने अदा करा अन्यथा तीव्र लढा उभारावा लागेल, असा इशारा श्रमजीवीचे संस्थापक विवेक पंडित यांनी दिला आहे.
कर्मचाऱ्यांनी मजुरी देण्याची सर्व प्रक्रिया वेळेत पार पाडल्यानंतर आॅन लाईन प्रक्रियेतून परस्पर मजूरी अदा केली जाते. परंतु वारंवार नो फंड अव्हेलेबल असा संदेश येतो अशी माहिती मिळाली. त्यानंतर माहिती घेतली असता केवळ जव्हार, मोखाडा, विक्रमगड नव्हे तर पालघरसह अन्य तालुक्यातही हीच परिस्थिती आहे. रोजगार हमी योजना आयुक्तांकडे निधी प्राप्त झालेला नाही असे वारंवार सांगण्यात आले, अशी माहिती पंडित यांनी दिली.
कुपोषित मुलांसाठी असलेली योजना बंद करणे, स्तनदा मातांसाठी जाहिर केलेली अमृत आहार योजना सुुरु न करणे, कमी रोजगार काढणे आणि केलेल्या कामाची मजूरी न देणे हे सारे संतापजनक आहे, असेही पंडित यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
रोजगार हमी योजनेअंतर्गत पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू, तलासरी, विक्रमगड, वाडा, जव्हार, मोखाडा या सात तालुक्यामध्ये रस्ते बांधणे, खड्डे खोदणे, इ. कामे हाती घेण्यात आली होती. या तालुक्यातील बारा हजार मजुरांच्या ९०४ मस्टरवर मागील डिसेंबर महिन्यापासून हे मजूर काम करीत आहेत. त्यांची फेब्रुवारी महिन्यापर्यंतची पाच कोटीहून अधिक मजुरी थकली आहे. असे असतानाही मजुरानी आज ना उद्या आपली मजुरी मिळेल या आशेवर आपले काम सुरूच ठेवले आहे. त्यामुळे आतापर्यंत सुमारे साडेसहा ते सात कोटीच्या घरात ही थकबाकी पोहचली असून मजुराच्या कुटुंबाची उपासमार सुरू झाली आहे.