जव्हार अर्बनच्या १७ जागांसाठी ३५ उमेदवार रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2015 23:31 IST2015-07-17T23:31:26+5:302015-07-17T23:31:26+5:30
जव्हार तालुक्यासह पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात व पाच तालुक्यांत अग्रगण्य असलेल्या दी जव्हार अर्बन को-आॅप. बँकेच्या निवडणुकीसाठीचे मतदान २९ जुलै रोजी होणार आहे.

जव्हार अर्बनच्या १७ जागांसाठी ३५ उमेदवार रिंगणात
जव्हार : जव्हार तालुक्यासह पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात व पाच तालुक्यांत अग्रगण्य असलेल्या दी जव्हार अर्बन को-आॅप. बँकेच्या निवडणुकीसाठीचे मतदान २९ जुलै रोजी होणार आहे. त्या निवडणुकीसाठी एकूण ७० उमेदवारी अर्ज वैध ठरले. यापैकी किती उमेदवार व पॅनल उभे राहणार, याबाबत जिल्ह्यात प्रचंड उत्सुकता होती. १५ जुलै रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख होती. त्या दिवशी तब्बल ३५ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यामुळे बँकेच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होऊन १७ संचालकपदांसाठीच्या निवडणुकीत तब्बल ३५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले आहेत.
या निवडणुकीसाठी शिवसेना तसेच मित्रपक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीने युती करून शिवनेरी पॅनल स्थापन करून १७ पैकी १७ जागांवर आपले उमेदवार जाहीर केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १७ पैकी १६ जागांवर उमेदवार जाहीर केले, तर दोन अपक्ष उमेदवारदेखील रिंगणात असल्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
दी जव्हार अर्बन बँकेच्या जव्हार, मोखाडा, विक्रमगड, कुडूस, मनोर व बोईसर अशा सहा शाखा असून ११,००० च्या आसपास मतदार, सभासद आहेत. या निवडणुकीसाठी सहकार विभागाने जव्हार ८, मोखाडा २, खोडाळा १, विक्रमगड ४, वाडा १, कुडूस २ व मनोर येथे ३ अशी २१ मतदान केंदे्र तयार केली असून त्या त्या भागातील सभासद मतदार त्या केंद्रावर दि. २९ जुलै रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान करू शकतात, अशी माहिती निवडणूक पीठासीन अधिकाऱ्यांनी दिली. (वार्ताहर)