भाईंदरच्या उत्तन भागात बोगस डॉक्टरच्या उपचारात ३२ वर्षीय मच्छीमाराचा बळी
By धीरज परब | Updated: September 3, 2025 21:16 IST2025-09-03T21:15:39+5:302025-09-03T21:16:02+5:30
लोकांच्या संताप नंतर पालिकेची गुन्हा दाखल करण्याची तर पोलिसांची चौकशीची कार्यवाही

भाईंदरच्या उत्तन भागात बोगस डॉक्टरच्या उपचारात ३२ वर्षीय मच्छीमाराचा बळी
धीरज परब
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड- भाईंदरच्या उत्तन नाका येथे रुग्णालय, दवाखाना, रक्त तपासणी आदी थाटून लोकांवर उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टर मुळे एका ३२ वर्षीय मच्छीमाराचा मृत्यू झाल्याचा तसेच पोलीस आणि महापालिकेने तात्काळ कारवाई न केल्याचा संताप नागरिकांनी व्यक्त केला. त्या नंतर पालिकेने त्या बोगस डॉक्टर विरुद्ध उत्तन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची कार्यवाही तर पोलिसांनी देखील चौकशी सुरु केली आहे.
उत्तनच्या नवीखाडी भागात राहणार ग्लेस्टन गिल्बर्ट घोन्साल्विस ह्या ३२ वर्षीय मच्छीमारास बरे वाटत नव्हते म्हणून करईपाडा येथील उत्तन चॅरिटेबल ट्रस्ट दवाखान्यात सोमवारी गेला होता. स्वतःला डॉक्टर म्हणवणाऱ्या फय्याज आलम ह्याने औषधे दिली व रक्त तपासणी करण्यास सांगून सायंकाळी पुन्हा बोलावले. सायंकाळी ग्लेस्टन गेल्या नंतर त्याला इंजेक्शन सलाईन द्वारे दिले गेले. त्यानंतर अर्ध्यातासातच ग्लेस्टनची प्रकृती बिघडली व प्रचंड थंडीताप आला.
त्याना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवले मात्र त्यांचा मृत्यू झाला होता. चांगला धडधाकट व तरुण असलेल्या ग्लेस्टनच्या ह्या दुर्दैवी मृत्यू मुळे मच्छीमार व नातलग संतप्त झाले. नातलग व मच्छीमारांनी पोलिसांना तक्रार करत फय्याज वर कारवाईची मागणी केली. मात्र पोलिसांनी दुर्लक्ष केले असा आरोप होत आहे.
मंगळवारी परिसरातील सातत्याने होणाऱ्या मृत्यूच्या घटनां प्रकरणी मच्छीमार नेते बर्नड डिमेलो यांनी पालिकेत तक्रार करत कारवाईची आणि आरोग्य मोहीमची मागणी केली. बुधवारी स्थानिक माजी नगरसेविका शर्मिला बगाजी, मनसेचे संदीप राणे सह मच्छीमारांनी उत्तन पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ निरीक्षक शिवाजी नाईक यांना तक्रार देत तात्काळ गुन्हा दाखल करून फय्याज ह्याला अटक करा अन्यथा आंदोलन करू असा इशारा दिला.
ह्या नंतर मीरा भाईंदर महापालिका प्रशासन जागे झाले व फय्याज याची कोणतीच नोंदणी पालिकेत नसल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे पत्र उत्तन भागातील पालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक पाडवी यांना देण्यात आले. बुधवारी रात्री उशिरा फय्याज विरुद्ध डॉ. पाडवी फिर्याद देण्याची कार्यवाही करत होते. तर उत्तन पोलिसांनी देखील आता याची चौकशी सुरु केली आहे.
फय्याज ह्याने उत्तन नाका येथे २ मजली इमारत भाड्याने घेऊन रुग्णालय सुमारे अडीज - तीन महिन्या पासून सुरु केले होते. करईपाडा येथे देखील दवाखाना थाटला होता. परंतु पालिके कडे नोंदणी केली नव्हती. भर वस्तीत वर्दळीच्या ठिकाणी फय्याज आलम ह्याने दोन्ही ठिकाणी दवाखाना, रुग्णालय चालवत होता. दोन्ही ठिकाणी फलकावर त्याने स्वतःचे नाव व डिग्री नमूद केली नव्हती. तरी देखील महापालिकेने वेळीच ठोस कारवाई केली नाही. पालिकेने वेळीच कठोर कारवाई केली असती तर ग्लेस्टनचा जीव वाचला असता. त्यामुळे पोलिसांसह पालिका अधिकाऱ्यांवर पण कारवाईची, सखोल चौकशीची मागणी केली जात आहे.