भाईंदरमधून २ बांग्लादेशी महिलांना पकडले
By धीरज परब | Updated: December 25, 2023 18:47 IST2023-12-25T18:47:01+5:302023-12-25T18:47:30+5:30
रोजगुल इस्लाम सद्यर (५८) व अनुअराबेगम अन्सरअली तोफादर (६०) अशी दोघींची नावे असून त्या नवघरच्या इंदिरा नगर झोपडपट्टीत राहत होत्या.

भाईंदरमधून २ बांग्लादेशी महिलांना पकडले
मीरारोड - भाईंदर पूर्वेच्या नवघर नाका येथून पोलिसांनी २ बांग्लादेशी वृद्ध महिलांना शनिवारी पकडले आहे अशी माहिती पोलीस आयुक्तालयाचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी दिली आहे. नवघर नाका येथील हनुमान मंदिरा जवळ दोन बांग्लादेशी महिला येणार असल्याची माहिती नवघर पोलिसांना मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सुशीलकुमार शिंदे, सहायक निरीक्षक विशाल धायगुडे, उपनिरीक्षक तुषार माळोदे, हवा. जावळे यांनी सापळा रचला.
त्याठिकाणी मिळालेल्या माहिती नुसार दोन महिला आल्या असता त्यांना ताब्यात घेतले. कोहीनुरबेगम रोजगुल इस्लाम सद्यर (५८) व अनुअराबेगम अन्सरअली तोफादर (६०) अशी दोघींची नावे असून त्या नवघरच्या इंदिरा नगर झोपडपट्टीत राहत होत्या. मूळच्या त्या बांग्लादेशच्या असून भाईंदर मध्ये घरकाम करून उपजीविका चालवत होत्या. अनधिकृतपणे पश्चिम बंगाल मार्गे भारतात आलेले असल्याचे त्यांनी सांगितले व त्यांच्या कडे भारतात राहण्यासाठीची आवश्यक कोणतीच कागदपत्रे नसल्याने नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.