सहाय्यक आयुक्तांकडे २ प्र.समित्या
By Admin | Updated: January 6, 2016 01:00 IST2016-01-06T01:00:02+5:302016-01-06T01:00:02+5:30
वसई विरार महापालिकेची पदे भरली जात नसल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. पालिकेच्या एकूण नऊ प्रभाग समितींच्या सहाय्यक आयुक्तपदाचा कार्यभार पालिकेती

सहाय्यक आयुक्तांकडे २ प्र.समित्या
शशी करपे, वसई
वसई विरार महापालिकेची पदे भरली जात नसल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. पालिकेच्या एकूण नऊ प्रभाग समितींच्या सहाय्यक आयुक्तपदाचा कार्यभार पालिकेतील कर्मचाऱ्यांवर सोपवण्यात आला आहे. यातही तिघांकडे दोन-दोन समित्यांचा कारभार देण्यात आला आहे. तर प्रतिनियुक्तीवर आलेल्या इंजिनियरला सहाय्यक आयुक्त बनवून त्याच्याकडे दोन प्रभाग समित्या देण्यात आल्या आहेत. तर नालासोपारा येथील विभागीय कार्यालयात जागेअभावी दोन सभापतींचा कारभार एकाच दालनात सुरु असल्यामुळे नागरिक आणि कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
वसई-विरार महापालिकेच्या पहिल्या टर्ममध्ये एकूण पाच समित्या होत्या. या अ, ब, क, ड, ई समितीच्या सभापतींना बोळींज, पेल्हार, नालासोपारा, माणिकपूर आणि वसई अशी स्वतंत्र कार्यालयेही होती. दुसऱ्यांदा निवडणूक झाल्यानंतर पालिकेच्या ए, बी, सी, डी, ई, एफ, जी, एच आणि आय अशा नऊ समित्या तयार झाल्या. प्रत्येक समितीचा कारभार पाहण्यासाठी प्रभारी सहाय्यक आयुक्तांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. मात्र, प्रतिनियुक्तीवर सहाय्यक आयुक्तांच्या जागा भरल्या न गेल्याने पालिकेतील काही जणांना प्रभारी सहाय्यक आयुक्त बनवण्यात आले आहे. त्यानंतरही अधिकारी कमी पडत असल्यामुळे तीन जणांकडे प्रत्येकी दोन-दोन प्रभाग समित्या सोपवण्यात आल्या आहेत. स्मिता भोईर, राजेश घरत आणि सुरेश पवार यांच्याकडे प्रत्येकी दोन-दोन समित्यांचा कार्यभार आहे. महापालिकेच्या नियमात सहाय्यक आयुक्तपद हे नॉन-टेक्निकल पद आहे. या पदावर नॉन-टेक्निकल पदाचा अधिकारी बसवणे गरजेचे असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातून प्रतिनियुक्तीवर आलेले इंजिनियर सुरेश पवार यांना सहाय्यक आयुक्त बनवून त्यांच्याकडे दोन प्रभाग समित्या देण्यात आल्या आहेत.
नऊ समित्यांच्या स्वतंत्र कारभारासाठी ९ स्वतंत्र कार्यालये तयार करण्यात आलीच नाहीत. त्यामुळे आता विभागीय कार्यालयांमध्ये समित्यांचे सभापती आणि प्रभारी सहाय्यक आयुक्त कारभार पाहत आहेत. एका कार्यालयातील एकाच दालनात दोन सभापती आणि दुसऱ्या दालनात दोन सह आयुक्त एकत्र बसून कारभार पाहत आहेत. नालासोपारा आणि मागील प्रभाग क च्या कार्यालयात आता प्रभाग ब आणि प्रभाग ई चे सभापती आपला कारभार करीत आहेत. या कार्यालयातील सहाय्यक आयुक्तांच्या दालनात प्रभाग ब चे सहाय्यक आयुक्त अशोक गुरव आणि ईचे सहाय्यक आयुक्त राजेश घरत बसत होते. तर त्यांच्या बाजुच्या दालनात ब चे सभापती भरत मकवाना आणि ई चे सभापती पंकज चोरघे बसत आहेत. काही दिवसांपुर्वी सामान्य प्रशासनाचे दालन रिकामे करून राजेश घरत यांना देण्यात आले. त्यामुळे सहाय्यक आयुक्त वेगळे झाले असले तरी सभापती मात्र एकाच दालनात बसत आहेत.
एकाच कार्यालयात दोन सभापती आणि सहाय्यक आयुक्त आपला कारभार पाहत असल्यामुळे नागरिक आणि कर्मचाऱ्यांमध्ये वारंवार गोंधळ उडत आहे. दोन्ही प्रभागांचे कर्मचारी वेगळे असले तरी एकाच कार्यालयात तैनात असल्यामुळे कोणत्या सभापती अथवा सहाय्यक आयुक्तांच्या सूचना, आदेश ऐकायचे या संभ्रमामुळे दैनंदिन काम रेंगाळत चालले आहे. आधीच कर्मचाऱ्यांचा तुटवडा असताना आपल्या दैनंदिन कामकाजासाठी कर्मचाऱ्यांची पळवा-पळवी करण्याची ओढ अधिकाऱ्यांमध्ये लागली आहे. त्यामुळे काम करूनही कर्मचाऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. तर राजेश घरत नवघर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त असताना त्यांची अचानक उचलबांगडी केली होती. एक महिन्याच्या रजेनंतर घरत मुख्यालयात काम करीत होते. सहा महिन्यांनी घरत यांना सहाय्यक आयुक्तपदावर बसवून आता त्यांच्याकडेही दोन प्रभाग समित्या देण्यात आल्या आहेत.