नागरी वस्तीतून पकडले १९ साप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 23:37 IST2018-10-19T23:37:22+5:302018-10-19T23:37:40+5:30
नालासोपारा : वसई तालुक्यातील नागरी वस्तीतून एकाच दिवशी अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल विविध जातींचे १९ सर्प पकडल्यामूळे नागरीकांमध्ये खळबळ ...

नागरी वस्तीतून पकडले १९ साप
नालासोपारा : वसई तालुक्यातील नागरी वस्तीतून एकाच दिवशी अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल विविध जातींचे १९ सर्प पकडल्यामूळे नागरीकांमध्ये खळबळ उडाली आहे. गेल्याच महिन्यात नागरी वस्तीतून दोन मोठ्या घोरपडी पकडण्यात आल्या होत्या.
वसई विरार महापालिकेची पाच अग्निशमन केंद्रे आहेत. अद्ययावत सामुग्रीसह तैनात असलेल्या या केंद्रातील कर्मचाऱ्यांमध्ये सर्पमित्रही आहेत. नागरी वस्तीत साप आढळून येत असतात. याबाबत अग्निशमन दलाच्या केंद्रात नागरीकांचे फोन येत असतात. मात्र बुधवारी सकाळपासून अग्निशमन दलाच्या केंद्रात तब्बल १९ फोन साप आढळून आल्याचे आल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना पकडून ताब्यात घेतले आहे.यात विषारी व बिनविषारी सापांचा समावेश आहे.
आग लागणे असो किंवा कुठेही इमारत कोसळणे असो, गॅसगळती असो किंवा एखादा पक्षी झाडावर किंवा कोणत्याही वायरवर अडकलेला असो, अशा आपत्तीच्या प्रसंगी अग्नीशमन दलाला पाचारण केलं जातं. मात्र अनेकदा चुकून फोन लागला किंवा अगदी गंमत म्हणून काही जण कॉल करतात. परंतु कॉल आल्यावर प्रत्येक कॉलची घटनास्थळी धाव घेत शहानिशा करावी लागते. बुधवारी १९ कॉल आल्यावर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन १९ वेगवेगळ्या प्रकारचे सरपटणारे जीव पकडून ताब्यात घेतले आहेत.
यात २ घोणस, ४ बिनविषारी पाणदिवड, २डुल्या नाग, ६ धामण, २ धूळनाग , ३ नाग अशा विषारी व बिनविषारी सापांचा समावेश आहे. या १९ सरपटणा-या जिवांना पकडून त्यांना वसई पूर्व येथील तुंगारेश्वर येथील जंगलात सोडण्यात आले आहे.
उंदरांमुळे होते घुसखोरी
वाढत्या मानवी वस्तीमूळे जंगले व डोंगर नष्ट होत चालली आहेत. नागरी वस्तीतून मोठ्या प्रमाणात उरलेले अन्न व खरकटे कचराकुंडीत फेकले जाते. त्यामूळे या खरकट्या अन्नावर मोठ्या प्रमाणात उंदिर पोसले जात असतात. या उंदरांच्या मागावर साप नागरी वस्तीत शिरू लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली.