१२२ करोड घोटाळ्याच्या फाईली वसई-विरार महापालिकेत गायब ?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2019 11:51 PM2019-06-01T23:51:22+5:302019-06-01T23:51:40+5:30

कंत्राटदार दोषी आहेत पण यांना महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी साथ दिली नसती तर इतका मोठा घोटाळा होऊच शकला नसता

122 crore scam files missing from Vasai-Virar Municipal Corporation? | १२२ करोड घोटाळ्याच्या फाईली वसई-विरार महापालिकेत गायब ?

१२२ करोड घोटाळ्याच्या फाईली वसई-विरार महापालिकेत गायब ?

googlenewsNext

नालासोपारा : वसई तालुक्यात १२२ करोडचा घोटाळा केला म्हणून २५ कंत्राटदारावर विरार पोलीस ठाण्यात २ मार्च २०१९ ला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घोटाळ्याच्या फाईली विरार मुख्यालयातून महानगरपालिकेचे काही वरिष्ठ अधिकारी गायब करण्याच्या बेतात असून पोलिसांना उल्लू बनवण्यासाठी हे सर्व षड्यंत्र सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून दैनिक लोकमतला कळले आहे. कंत्राटदार दोषी आहेत पण यांना महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी साथ दिली नसती तर इतका मोठा घोटाळा होऊच शकला नसता. कर्मचाऱ्यांचे शासनाला, कामगार आयुक्तांना, पीएफचे पैसे भरण्याची संपूर्ण जबाबदारी महानगरपालिकेची होती मग लेखा विभाग, ऑडीटर त्यावेळी काय करत होते? दरवर्षी ऑडिट होत होते की नाही ? वास्तविक सदर घोटाळ्याच्या गुन्ह्याची तक्रार ऑडीटरने विरार पोलीस ठाण्यात देणे गरजेचे होते पण त्याने ती दिलीच नाही. म्हणून महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आता शक्कल लढवली असून ते सगळ्या फाईली गायब करण्याच्या बेतात असल्याचे सूत्रांकडून कळते. तसेच तपासात पोलिसांकडून विचारणा झाली तर आमच्याकडे रेकॉर्ड नाही म्हणून संबंधित अधिकाºयांना नोटीस बजावण्यात आले असल्याचे सांगणार असल्याचा प्लॅन आखल्याचेही कळते.

महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी सेवानिवृत्त आणि कार्यरत असणाºया व या घोटाळ्यास जवाबदार म्हणून चार जणांना २०१८ सालच्या डिसेंबर महिन्यात नोटिसा काढून त्यांना व्यक्तीश: जवाबदार धरून त्यांच्यावर जवाबदारी निश्चित केली असून आक्षेपार्ह रक्कम न भरल्यास निवृत्ती देयकातून तीची वसुली करण्याची कारवाई करणार असल्याच्या नोटिसा धाडल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळते. तर एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याने हेरवाडे यांच्या नोटीसीला कायदेशीर उत्तर दिले असल्याचेही बोलले जात आहे. एखादा अधिकारी सेवानिवृत्त होतो त्यावेळी नियमानुसार त्या अधिकाऱ्यांची फाईल आयुक्तांकडे जाते की तुमच्यावर काही थकबाकी नाही ना ? तुमच्यावर काही आक्षेप आहे का ? कोणता आरोप आहे का ? ही तपासणी झाल्यानंतरच सेवानिवृत्त केले जाते. ज्या सेवानिवृत्त अधिकाºयांना त्यावेळी क्लीन चिट देण्यात आली मग आता कशी काय थकबाकी असल्याची नोटीस काढण्यात आली आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

१२२ करोड घोटाळ्याच्या फाईली नवघर माणिकपूर महानगरपालिकेतील महिला विभागाच्या कार्यालयातून भांडार विभागाच्या प्रमुखाकडून विरारच्या मुख्यालयातून आलेल्या अधिकाºयाने मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नेल्या असल्याचेही कळते. या फाईली गायब करून हे प्रकरण सेवानिवृत्त व कार्यरत अधिकाऱ्यांच्या अंगावर शेकविण्याचा घाट वरिष्ठ अधिकाºयांकडून सुरू असल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.त्यामुळे तक्रारदार मनोज पाटील यांनी तात्काळ फाईली ताब्यात घेण्यास अथवा गहाळ झाल्यास आपण जबाबदार असल्याचे पत्र पोलिस व आयुक्तांना देणे गरजेचे आहे असा दावा केला आहे.

सदर गुन्ह्याप्रकरणी न्यायालयात अटकपूर्व जामिनावर सुनावणी असून मंगळवारी ४ जूनला सुनावणी आहे. कोणत्या कंत्राटदाराने कितीचा अपहार केला, कोणाचा किती रोल आहे याचा तपास चालू आहे. - महेश शेट्टे (पोलीस निरीक्षक व तपास अधिकारी, आर्थिक गुन्हे शाखा)

घोटाळ्याच्या फाईली अशा कशा गायब होतील. त्यांचे रेकॉर्ड आहे. पोलिसांना माहिती देण्यासाठी फाईली नवघर माणिकपूर महानगरपालिकेच्या कार्यालयातून मुख्यालयात आणल्या असतील. तरी त्या फाईलीची नोंद राहते, इनवर्ड आणि आऊटवर्ड असणार, फाईली कुठे कुठे गेल्या व कुठे कुठे आहेत याच्या नोंदी असतील. - बळीराम पवार, आयुक्त, वसई विरार शहर महानगरपालिका

नेमके काय होते प्रकरण... : वसई विरार मनपाच्या ३१६५ ठेका कर्मचाºयांचा पगार, वैद्यकीय भत्ता, घर भत्ता या ठेकेदारांनी हडप केला आहे. एकूण १२२ करोड च्या घोटाळ्यात २९ करोड ५० लाख रुपयांचा शासकीय महसूलचाही समावेश असून ९२ करोड ५० लाख रुपये कर्मचाºयांच्या पगाराचे आहेत. ठेका कर्मचाºयांच्या पगारावरच डल्ला मारल्या प्रकरणी मनोज पाटील यांच्या पाठपुराव्याने विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाचे काय झाले ?: लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या जाहीर प्रचार सभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरारला आले होते. एकनाथ शिंदे यांनी मागणी केल्यावर मुख्यमंत्र्यांनी भाषणामध्ये वसई विरार महानगरपालिकेची एस आय टी मार्फत चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते पण निवडणुका पार होताच हे आश्वासन हवेत विरल्याची चर्चा सध्या वसई तालुक्यात सुरू आहे.

घोटाळा नक्की कितीचा ? : १२२ करोडचा घोटाळा झाला म्हणून विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला पण याची वास्तविकता पाहता हा घोटाळा १० पटीपेक्षा जास्त असल्याचे सूत्रांकडून कळते आहे. म्हणून या घोटाळ्याची एस आय टी चौकशी केली तर दूध का दूध आणि पानी का पानी होऊन याचे बिंग फुटून घोटाळा कितीचा झाला हे उघड होईल तर या घोटाळ्यास नक्की कोण जवाबदार आहे हे सुद्धा बाहेर येईल.

Web Title: 122 crore scam files missing from Vasai-Virar Municipal Corporation?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.