गंभीररीत्या भाजलेल्या रूपालीवर १२ तासांनी उपचार
By Admin | Updated: April 23, 2017 03:49 IST2017-04-23T03:49:30+5:302017-04-23T03:49:30+5:30
तालुक्यातील चहाडे ग्रामपंचायत हद्दीतील सज्जनपाडा (वरचापेठा) येथील जि.प. शाळेच्या तिसरी इयत्तेत शिकणाऱ्या ९ वर्षीय रूपाली वरठा गुरुवारी सायंकाळी तिच्या घराजवळच्या

गंभीररीत्या भाजलेल्या रूपालीवर १२ तासांनी उपचार
- हितेन नाईक, पालघर
तालुक्यातील चहाडे ग्रामपंचायत हद्दीतील सज्जनपाडा (वरचापेठा) येथील जि.प. शाळेच्या तिसरी इयत्तेत शिकणाऱ्या ९ वर्षीय रूपाली वरठा गुरुवारी सायंकाळी तिच्या घराजवळच्या वीजवाहिनीचा झटका लागून गंभीर जखमी झाली. तिच्यावर उपचारासाठी तिच्या नातेवाइकांना पालघर, ठाणे, मुंबई असा तब्बल १२ तासांचा प्रवास करावा लागला. सध्या ती सायन रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.
लहानपणीच आईचे छत्र हरवलेली रूपाली आपल्या घराच्या परिसरात खेळत असताना कुंभाची फळे तोडण्यासाठी झाडावर चढली. जवळच्या वीजवाहक तारेचा स्पर्श झाल्याने ती बराच वेळ चिटकून होती. काही ग्रामस्थांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी तत्काळ महावितरण कर्मचाऱ्यांना फोन करून विद्युतपुरवठा खंडित करून तिला खाली उतरवले.
महत्प्रयासाने ठाणे जिल्हा रुग्णालयात रात्रीच्या सुमारास पोहोचल्यानंतर तिच्यावर उपचार सुरू झाले. मात्र, तिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मेंदूतून रक्तस्राव होत असल्याचे सांगून डॉक्टरांनी तिला मुंबई येथील जे.जे. रुग्णालयात हलवण्यास सांगितले. जखमेने विव्हळत असलेल्या रूपालीला रुग्णवाहिकेने जे.जे.मध्ये नेण्यात आले. तेथे प्रथम कागदपत्रे बनवण्यात खूप वेळ गेला. तेथे तब्बल अर्धा ते पाऊण तास तिला या अवस्थेत ताटकळत राहावे लागले. सर्व सोपस्कारांनंतर शेवटी तिला जे.जे.मध्ये दाखल केले. मात्र, जळालेल्या रुग्णासाठी जागा उपलब्ध नसल्याचे कारण देत तिला दुसरीकडे हलवण्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पुन्हा तिला केईएम किंवा सायनला हलवण्याची तयारी सुरू झाली. मात्र, जे.जे.मध्ये झालेले हाल पाहता रूपालीच्या नातेवाइकांनी नायर जवळ असल्याने तेथे हलवण्याचा निर्णय घेतला. शेवटी, शुक्रवारी सकाळी ९ वाजता नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. काल सायंकाळी ५.३० पासून तिच्यावर खऱ्या अर्थाने उपचार सुरू झाले.
सुरूवातीला ग्रामस्थांनी तिला मासवणच्या ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र, योग्य उपचाराची कमतरता असल्याने तिला ग्रामीण रुग्णालय पालघर येथे नेण्यात आले. तिथेही तिच्यावर योग्य उपचार सुविधा नसल्याने शेवटी पालघरमधील ढवळे रुग्णालयात दाखल करून तिच्या जखमांवर तात्पुरती मलमपट्टी करून पुन्हा तातडीने मुंबई येथे हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी नातेवाइकांना दिला. वेदनेने ती तळमळत असताना मुंबईला नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने तिला ढवळेतून पुन्हा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे पर्यायी बर्न केअरसाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयात नेण्यास सांगितले.
- जखमेने विव्हळत असलेल्या रूपालीला रुग्णवाहिकेने जे.जे.मध्ये नेण्यात आले. तेथे कागदपत्रे बनवण्यात अर्धा ते पाऊण तास गेला. त्यानंतर मात्र, जळालेल्या रुग्णासाठी जागा उपलब्ध नसल्याचे कारण देत तिला दुसरीकडे हलवण्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.