सायबर पोलिसांनी १ लाख रुपये दिले मिळवून
By धीरज परब | Updated: January 9, 2024 18:00 IST2024-01-09T18:00:32+5:302024-01-09T18:00:52+5:30
विरार भागातील धनेश पाटील यांना क्रेडिटकार्ड विभागातून बोलत असल्याचा कॉल आला होता.

सायबर पोलिसांनी १ लाख रुपये दिले मिळवून
मीरारोड - क्रेडिट कार्ड विभागातून बोलत असल्याचे सांगून सायबर लुटारूंनी १ लाखांची फसवणूक केलेली रक्कम सायबर पोलिसांनी परत मिळवून दिली. विरार भागातील धनेश पाटील यांना क्रेडिटकार्ड विभागातून बोलत असल्याचा कॉल आला होता. केवायसी अपडेट करायची आहे असे अनोळखी व्यक्तीने सांगितल्या नंतर पाटील यांनी अनोळखी व्यक्तीला स्वतःची व्यक्तिगत माहिती दिलीच शिवाय अनोळखी व्यक्तीने पाठवलेली लिंक ओपन केली. त्याद्वारे पाटील यांच्या बँक खात्यातून १ लाख ७९१ रुपये सायबर लुटारूंनी घेऊन फसवणूक केली.
या प्रकरणी मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या मीरारोड येथील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार आली. पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सहायक निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, उपनिरीक्षक प्रसाद शेनोलकर सह प्रवीण आव्हाड, गणेश इलग, कुणाल सावळे, प्रशांत बोरकर, पल्लवी निकम यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण करत गुन्ह्याचा तपास सुरु केला. तेव्हा पाटील यांची रक्कम हि नो ब्रोकर या खात्यावर गेल्याचे दिसून आले. पोलिसांनी कंपनीशी पत्रव्यवहार करून व संपर्क साधून फसवणूक केलेली रक्कम आधी गोठवली व नंतर पाटील यांच्या खात्यात वळती केली.