मांगेला परिषदेला आमदार घोडांचे १ लाख
By Admin | Updated: March 1, 2016 01:50 IST2016-03-01T01:50:15+5:302016-03-01T01:50:15+5:30
मच्छीमार समाजातील तरूणांमधील सुप्तगुणांना हेरून त्यांच्यातील क्रीडाकौशल्ये विकसीत केल्यामुळेच मांगेला मच्छीमार समाजातील तरूण-तरूणी आज आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकत आहेत.

मांगेला परिषदेला आमदार घोडांचे १ लाख
पालघर : मच्छीमार समाजातील तरूणांमधील सुप्तगुणांना हेरून त्यांच्यातील क्रीडाकौशल्ये विकसीत केल्यामुळेच मांगेला मच्छीमार समाजातील तरूण-तरूणी आज आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकत आहेत. अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेने मागील २५ वर्षापासून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक वसा जपत चालविलेले क्रीडाधोरण अत्यंत स्पृहणीय असून त्यांच्या कार्याला बळकटी यावी म्हणून पालघरचे नवनिर्वाचित आ. अमीत घोडा यांनी समाज परिषदेला १ लाख रू. ची देणगीही जाहीर केली.
अखिल भारतीय मांगेला समाजपरिषद ही कुलाबा ते गुजरात राज्यापर्यंतच्या १०८ गावातील समाजबांधवांना सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा-सांस्कृतीक इ. माध्यमातून एकत्र ठेवण्याचे कार्य मागील २५ वर्षापासून करीत आहे. दि. २१ ते २८ फेब्रुवारी दरम्यान खारेकुरण येथे १ हजार ८०० खेळाडूंचा सहभाग असलेल्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यांचा समारोप काल संध्याकाळी झाला. यावेळी आ. अमीत घोडा, अध्यक्ष अशोक तांडेल, सचीव नरेंद्र नाईक, क्रीडाअध्यक्ष संतोष मर्दे, हेमंत मेहेर, प. स. सभापती रविंद्र पागधरे, मच्छीमार नेते दामोदर तांडेल, राजन मेहेर, प्रशांत नाईक, भुवनेश्वर मेहेर, अशोक नाईक, सुधीर तामोरे, पंढरीनाथ तामोरे, इ. मान्यवर उपस्थित होते.
क्रिकेट (पुरूष) अंतीम विजयी म्हणून दांडी संघाने चिंचणी संघाला पराभूत केले. मालिकावीर म्हणून किरण आरेकर (दांडी) यांची निवड करण्यात आली. महिलांच्या क्रिकेट संघात गुंगवाडा संघाने दांडी संघाचा पराभव केला. सामनावीर म्हणून दिपीका नायगावकर (गुंगवाडा) हीची निवड करण्यात आली. क्रिकेट पुरूष संघातून वडराईच्या दौलत मेहेर यांनी १८ चेंडूत ७१ धावाचा पाऊस पाडताना ८ उत्तुंग षटकार तर ४ चौकार मारले तर महिला संघातून खेळणाऱ्या कांबोड्याच्या प्रिया केणी हिने २२ चेंडूत ८५ धावांची तुफानी खेळीमध्ये ८ षटकार व ४ चौकार लगावून क्रिकेटरसिकांना मंत्रमुग्ध केले.
कबड्डी स्पर्धेत (पुरूष) नरपड संघाने कळंबसंघाचा पराभव केला व विजेतेपद पटकावले. सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून नरपडच्या प्रज्योत तांडेल यांची निवड करण्यात आली तर महिला कबड्डी संघातून धाकटी डहाणू संघाने वडराई संघाचा पराभव करून विजेतेपद पटकाविले. सूर्यनमस्कार स्पर्धेत नयन राऊत, बुद्धीबळ (१६ वर्षाखालील), विदीती राऊत (प्रथम), खुलागट हिराजी तांडेल (मु. माहिम), मॅरेथॉन (१६ वर्षाखालील मुले), जिग्नेश मेहेर (प्रथम), (१६ वर्षाखालील मुली) दुर्वा आरेकर (दांडी) प्रथम, खुलागटात दर्शन तामोरे (चिंचणी) याने प्रथम क्रमांक पटकााविला. जोर बैठका स्पर्धेत गणेश मेहेर (वडराई) यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. (वार्ताहर)