जि.प. शाळांबाबत जगातील दुसरा तंबाखूमुक्त जिल्हा
By Admin | Updated: May 3, 2017 00:44 IST2017-05-03T00:44:24+5:302017-05-03T00:44:24+5:30
जिल्हा परिषदेतील ध्वजारोहण समारंभात जि.प. अध्यक्ष नितीन मडावी व मुख्य कार्यकारी अधिकार नयना गुंडे यांनी

जि.प. शाळांबाबत जगातील दुसरा तंबाखूमुक्त जिल्हा
महाराष्ट्रदिन समारंभात घोषणा : जि.प. च्या सर्व ९२७ शाळा व्यसनापासून दूर
वर्धा : जिल्हा परिषदेतील ध्वजारोहण समारंभात जि.प. अध्यक्ष नितीन मडावी व मुख्य कार्यकारी अधिकार नयना गुंडे यांनी वर्धा जिल्हा हा जगातील दुसरा तंबाखूमुक्त जि.प. प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांचा जिल्हा म्हणून घोषित केला.
जिल्ह्यातील नवी पिढी व्यसनमुक्त राहावी, त्यांच्यात व्यसनविरोधी मानसिकता तयार व्हावी, यासाठी जिल्हा परिषद, सलाम मुंबई फाऊंडेशन व बजाज इलेक्ट्रीकल्स लिमिटेड यांनी आॅगस्ट २०१५ पासून तंबाखूमुक्त शाळा अभियान जिल्ह्यात ९२७ जि.प. शाळांमध्ये राबविले. शिक्षक, मुख्याध्यापकांनी हिरिरीने उपक्रमात भाग घेतला. या शाळांनी जागतिक आरोग्य संघटनेचे तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्थेचे ११ निकष पूर्ण केले आहेत. अभियानांतर्गत अनेक शिक्षक, पालकांनी तंबाखूजन्य पदार्थाचे व्यसन सोडले आहे. व्यसनमुक्त झालेल्या सर्व शिक्षक, पालकांचा सत्कार ‘वर्धा श्री’ प्रमाणपत्र देऊन केला जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांचे व्यसन सोडविले, त्या विद्यार्थ्यांनाही ‘वर्धाभूषण’ हे प्रमाणपत्र दिले जाईल. सर्व तंबाखूमुक्त शाळांचा व अधिकारी वर्गाचा जुलै महिन्यात सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला जाणार आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे, शिक्षणाधिकारी किसन शेंडे, उपशिक्षणाधिकारी डॉ. वाल्मिक इंगोले, सर्व पं.स. गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक यांचे हा उपक्रम तळमळीने राबविल्याबद्दल अभिनंदन केले. यानंतर माध्यमिक शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालये व आरोग्य संस्था तंबाखूमुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला. ग्रामसभांमध्येही ग्रामसेवक व शिक्षकांनी तंबाखूमुक्त जीवनाची आणि भविष्यात गावातील शाळा तंबाखूमुक्त राखण्याची शपथ ग्रामस्थांना दिली.
जि.प. अध्यक्ष नितीन मडावी यांनी प्राथमिक शिक्षण विभागास शुभेच्छा देत १५ आॅगस्टपासून गावेही टप्प्या-टप्प्याने तंबाखूमुक्त करण्याचा संकल्प केला. समारोपप्रसंगी नयना गुंडे यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना तंबाखूमुक्त राहण्याची आणि आपली कार्यालये तंबाखूमुक्त बनविण्याची शपथ दिली.(कार्यालय प्रतिनिधी)