जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना अक्षरज्ञानच नाही
By Admin | Updated: March 6, 2015 01:50 IST2015-03-06T01:50:40+5:302015-03-06T01:50:40+5:30
जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्यावतीने वार्षिक शाळा तपासणी झाली. यात सेलू तालुक्यात जि.प. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना अक्षरज्ञान नसल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.

जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना अक्षरज्ञानच नाही
आकोली : जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्यावतीने वार्षिक शाळा तपासणी झाली. यात सेलू तालुक्यात जि.प. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना अक्षरज्ञान नसल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. शिवाय विद्यार्थ्यांच्या उपस्थिती बाबतही चिंता व्यक्त करणारी परिस्थिती आहे.
शिक्षकाला ब्रह्माची उपमा दिली गेली आहे. शिक्षकांनी प्रमाणिकपणे, निष्ठेने अध्यापनाचे पवित्र कार्य करणे अपेक्षित आहे. त्याकरिता शिक्षकांना वेतन दिले जाते. बहुतांश शिक्षक अध्यापनाशी बांधिलकी जोपासून विद्यार्जनाचे पवित्र कार्य करतात; मात्र काही केवळ वेतनाकरिताच कार्य करीत असल्याचे समोर येत आहे. सेलू तालुक्यात हिच स्थिती असल्याचे या तपासणीत समोर आले आहे. केवळ पगाराकरिता काम करणाऱ्या शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आल्याचे चित्र आहे.
सर्व शिक्षा अभियानातून शाळा चकचकीत झाल्या असल्या तरी शिक्षणाचा दर्जा मात्र सुमार होत चालला आहे. शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुखांकडून नियमाप्रमाणे वार्षिक शालेय तपासणी झाली. ही तपासणी काटेकोरपणे झाली वा कागदोपत्र हे लवकरच समोर येईल. असे असले तरी सेलू तालुक्यातील विद्यार्थ्यांचे वास्तव पुढे आले आहे. विद्यार्थ्यांची उपस्थितीही योग्यच दाखविण्यात आली आहे. यावेळी प्रत्येक विद्यार्थ्यांची स्वतंत्र पडताळणी घेण्यात आली. यात त्याला लिहीता येते का, वाचता येते का, गणित सोडविता येते का या बाबी पडताळण्यात आल्या. यावरून शिक्षकाचा अहवालही तयार करण्यात आला.(वार्ताहर)