जि.प. सीईओंच्या आश्वासनावर आंदोलन मागे
By Admin | Updated: October 4, 2016 01:58 IST2016-10-04T01:58:06+5:302016-10-04T01:58:06+5:30
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांकरिता कामबंद आंदोलन पुकारले होते.

जि.प. सीईओंच्या आश्वासनावर आंदोलन मागे
वर्धा : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांकरिता कामबंद आंदोलन पुकारले होते. यामुळे ग्रामीण भागातील आरोग्यसेवा कोलमडली होती. याच मागण्यांकरिता सोमवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी मुख्य कार्यपालन अधिकारी नयना गुंडे यांनी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून असलेल्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनावर सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आल्याचे संघटनेच्यावतीने कळविण्यात आले आहे.
आरोग्य विभागात शासनाची मान्यता असताना अनेक पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे त्वरीत भरण्यात यावी, गौळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी व एलआयसीच्या रकमेत असलेल्या घोळाची चौकशी करावी, यासह अनेक मागण्यांकरिता आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गत महिन्यात काळ्या फिती लावून आंदोलन पुकारले होते. मात्र या आंदोलनाकडे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले. यामुळे कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले. त्यांच्या या आंदोलनामुळे नागरिकांना अनेक अडचणी झाल्या, शिवाय आरोग्य विभागामार्फत शासनाच्या राबविण्यात येणाऱ्या योजनांचा खोळाबा झाला.
यावरही शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने सोमवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात आरोग्य कर्मचारी सहभागी झाले होते. या आंदोलनादरम्यान आरोग्य कर्मचाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मार्गी काढण्याकरिता २० आॅक्टोबर पर्यंतचा कालावधी मागितला. शिवाय या काळात या समस्या मार्गी काढण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनावर कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. चर्चेच्यावेळी जिल्हा प्रशासनाच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण, अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दिलीप उटाणे, विभागीय सचिव नलीनी उबदेकर, जिल्हा अध्यक्ष सिंध्दार्य तेलतुंबडे, जिल्हा सचिव प्रभाकर सुरतकर, उपाध्यक्ष विजय जांगडे, अमीत कोपूलवार, संजय डफरे, रतन बेंडे, माया राउत, कोषाध्यक्ष विजय वांदिले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
प्रत्येक मागणीचे आदेश जमा
४आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्याकरिता मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांच्या कक्षात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी संघटनेच्यावतीने करण्यात आलेली प्रत्येक मागणी शासनाच्या आदेशानुसार असल्याचे सांगण्यात आले. शिवाय करण्यात आलेल्या मागण्यांचे शासन आदेश मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यांना देण्यात आले. यामुळे सीईओंनी मागण्या मान्य करण्याकरिता अवधी मागितल्याची माहिती संघटनेच्यावतीने देण्यात आली.
२७ पीएससीतील काम ठप्प
४आरोग्य कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन आयोजित होते. या आंदोलनात जिल्ह्यातील संपूर्ण २७ प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित असल्याने या केंद्रातील आरोग्य सेवा कोलमडल्याचे दिसून आले. नागरिकांना तालुक्याच्या स्थळी जावून उपचार घ्यावे लागले.