जि.प. शाळा झाल्या कोंडवाडे

By Admin | Updated: July 24, 2014 23:59 IST2014-07-24T23:59:46+5:302014-07-24T23:59:46+5:30

तळागाळातील गोर-गरिबांची मुले शिकून मोठी व्हावी, दर्जेदार शिक्षण त्यांना घेता यावे यासाठी सर्वशिक्षा अभियानातून भरमसाठ निधी खर्च करून शाळा इमारती चकाचक करण्यात आल्या़ शाळांत

Zip Kondwade School | जि.प. शाळा झाल्या कोंडवाडे

जि.प. शाळा झाल्या कोंडवाडे

अध्यापन नावापुरतेच : सहावीच्या विद्यार्थ्यांना लिहिता येते केवळ नाव
आकोली : तळागाळातील गोर-गरिबांची मुले शिकून मोठी व्हावी, दर्जेदार शिक्षण त्यांना घेता यावे यासाठी सर्वशिक्षा अभियानातून भरमसाठ निधी खर्च करून शाळा इमारती चकाचक करण्यात आल्या़ शाळांत संगणक आले; पण विद्यार्थ्यांना विशेष शिक्षण दिले जात नसून केवळ वर्गांमध्ये कोंबले जाते़ यामुळेच ग्रामीण विद्यार्थ्यांना अद्यापही शिक्षणात गोडी निर्माण झाली नाही़ याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे़
पाचवी-सहावीच्या विद्यार्थ्यांना स्वत:च्या नावापलीकडे काही लिहता येत नाही. याची पडताळणी करायची झाल्यास अधिकाऱ्यांना ग्रामीण भागात यावे लागणार आहे़ शिक्षकांची अध्यापनातील रूची संपली असून शाळेत येण्याची आणि जाण्याची वेळ, हेच शिक्षकांचे काम झाले. प्रार्थनेनंतर विद्यार्थ्यांना वर्गात कोंबले की जबाबदारी संपली, असा प्रकार सुरू आहे़ पटावर हजेरी सर्वांची दिसत असली तरी निम्मे विद्यार्थी घरीच खेळत असल्याचे दिसते़ विद्यार्थ्यांना शिक्षणात गोडी निर्माण व्हावी म्हणून शासनाद्वारे विविध उपक्रम राबविले जातात; पण यंत्रणा ती केवळ कागदावरच राबविते़ यामुळे चवथीच्या विद्यार्थ्यांला ‘बे’चा पाढा येत नाही तर सातवीच्या विद्यार्थ्यांना ‘गुड मॉर्निंग’चे स्पेलींग येत नाही.
शिक्षणाधिकारी, गटशिक्षण अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख अशी उतरंड असलेली व्यवस्था केवळ खुर्चीची शोभा वाढवित असून शैक्षणिक दर्जा मात्र जैसे थे दिसतो़ शाळा व्यवस्थापन नावाची कुचकामी समिती बुजगावणे झाले आहे. शाळेत काय शिजते याकडे या समितीच्या सदस्यांचे लक्षच जात नसल्याचे दिसते़ गलेलठ्ठ पगार असतानाही अध्यापनात रूची नाही. गोरगरीब माणूस पोटाला चिमटा घेऊन आपल्या पाल्यांना शिकवितात; पण त्यांच्या शिक्षणाची बोंबच दिसून येते़ प्राथमिक पायाच ठिसूळ झाला आहे.
आठव्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बाराखडी शिकवावी काय, काहीच येत नाही हो! कोणत्या जंगलातून आले, असा सूर दिनकरनगर शाळेतील शिक्षकांचा होता़ नवीन शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षकांचे बोलणेच ऐकावे लागते़ यावरून जि.प. शाळांतून बाहेर पडणारी मुलांचे पुढील शैक्षणिक भवितव्य काय, हा प्रश्नच आहे़ शिक्षण विभाग व शिक्षक संघटनांनी याकडे लक्ष देत दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे़(वार्ताहर)

Web Title: Zip Kondwade School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.