संच निर्धारणाच्या दुरूस्तीकरिता जि.प. समोर शिक्षकांचे उपोषण
By Admin | Updated: February 5, 2015 23:13 IST2015-02-05T23:13:40+5:302015-02-05T23:13:40+5:30
शैक्षणिक सत्र २०१३-१४ मध्ये संच निर्धारणाध्ये शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षक संख्या चुकीच्या पद्धतीने निश्चित केल्याने अनेक शिक्षक अतिरिक्त ठरले. याची तक्रार शिक्षण उपसंचालकांकडे केली

संच निर्धारणाच्या दुरूस्तीकरिता जि.प. समोर शिक्षकांचे उपोषण
वर्धा : शैक्षणिक सत्र २०१३-१४ मध्ये संच निर्धारणाध्ये शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षक संख्या चुकीच्या पद्धतीने निश्चित केल्याने अनेक शिक्षक अतिरिक्त ठरले. याची तक्रार शिक्षण उपसंचालकांकडे केली असता त्यांनी यात दुरूस्ती करण्याच्या सूचना केल्या; मात्र शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी त्यांच्या पत्राला बगल देत कुठलीही दुरूस्ती केली नाही. संच निर्धारणात दुरूस्ती करण्याच्या मागणीकरिता गुरुवारपासून तक्रार निवारण समितीच्यावतीने जि.प. इमारतीसमोर उपोषण सुरू केले आहे.
शिक्षणाधिकाऱ्यांनी केलेल्या चुकीच्या संच निर्धारणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षक संख्या कमी झाल्याने अनेक शाळेत वर्ग नववी व दहावीच्या तुकड्या बंद पडल्या आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शासनाच्या निकषानुसार जर शिक्षकांचा विचार केला तर प्रत्येक शाळेत एक शिक्षक देय होत आहे. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानात नववी व दहावी इयत्तांचा समावेश केला आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी केलेल्या या संच निर्धारणामुळे शासनाच्या गुणवत्ता पुरक शिक्षणाच्या हेतुला छेद दिल्याचा आरोप तक्रार निवारण समितीने केला आहे. माजी खासदार सुरेश वाघमारे यांनी समस्या जाणून घेतली.(प्रतिनिधी)