जि.प. च्या १४ शाळांत पाचवा तर दोनमध्ये आठवा वर्ग प्रस्तावित
By Admin | Updated: May 22, 2014 01:23 IST2014-05-22T01:23:12+5:302014-05-22T01:23:12+5:30
तालुक्यातील जि.प. च्या १४ शाळांमध्ये पाचवा तर २ शाळांमध्ये इयत्ता आठवीचे वर्ग प्रस्तावित आहेत.

जि.प. च्या १४ शाळांत पाचवा तर दोनमध्ये आठवा वर्ग प्रस्तावित
आर्वी : तालुक्यातील जि.प. च्या १४ शाळांमध्ये पाचवा तर २ शाळांमध्ये इयत्ता आठवीचे वर्ग प्रस्तावित आहेत. २00९ च्या बालकांच्या मोफत शिक्षण कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी आर्वी पं.स. शिक्षण विभागाद्वारे २0१४-१५ या शैक्षणिक सत्रासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. इंग्रजी शाळेच्या तुलनेत जि.प. च्या मराठी माध्यमांच्या शाळांना सध्या सर्वत्र शालेय विद्यार्थी पटसंख्येच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागत आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात चार किमी अंतरावर शाळा नसल्याने शालेत विद्यार्थ्यांना आपल्या राहत्या गावापासून पायपीट करीत दुसर्या गावी शिकायला जावे लागते. बालकांच्या मोफत शिक्षणाच्या कायद्यांतर्गत सर्व शालेय मुलांना शिक्षण मिळावे. शालेय शिक्षणापासून कुणीही वंचित राहू नये, यासाठी आर्वी तालुक्यातील एक ते चार इयत्ता असलेल्या जि.प. च्या तालुक्यातील तहारी, सिल्ली, जांभुळधरा, काकडधरा, पिंपळगाव (भोसले), तळेगाव (रघुजी), उमरी, सावंगी, गौरखेडा, सर्कसपूर, सायखेडा, सुकळी (उबार), पिपरी, लाडेगाव आदी जि.प. च्या १४ शाळांमध्ये इयत्ता पाचचा वर्ग तर तालुक्यातील काचनूर पाचोड या दोन जि.प. शाळांत आठवा वर्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. तालुक्यातील ज्या शाळांत पाचवा वर्ग प्रस्तावित आहे, त्या सर्व शाळांची पटसंख्या पहिली ते चवथीची २४१ तर आठवा वर्ग प्रस्तावित असणार्या पहिले ते सातवीची पटसंख्या १४२ आहे. ज्या शाळेत एक किमीच्या आत पाचवा वर्ग नाही, अशा शाळेत पाचवा वर्ग तर ज्या शाळेत तीन किमीचे अंतर आहे; पण आठवा वर्ग नाही, त्या जि.प. शाळेत आठवा वर्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. आर्वी तालुक्यातील भादोड व पाचोड (विरूळ) ही दोन्ही गावे विद्यार्थ्यांना शिक्षणाला ये-जा करण्यासाठी सोईची नाही. मुलांना शाळेत जाण्याकरिता बारमाही रस्ता नाही. भादोड गावाच्या चार किमी परिसरात जिल्हा परिषदेची एकही शाळा नाही. या परिसरातील गावकर्यांना सहा किमीचे अंतर कापून पाचोड गावातील शाळेत यावे लागते. बालकांच्या मोफत शिक्षणाच्या कायद्यांतर्गत वर्धा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १0५ शाळांमध्ये पाचवा तर ४२ शाळांमध्ये आठवा वर्ग प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.(तालुका प्रतिनिधी)