‘त्या’ जि.प. शाखा अभियंत्याचा मृत्यू

By Admin | Updated: June 20, 2016 01:45 IST2016-06-20T01:45:48+5:302016-06-20T01:45:48+5:30

जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागातील शाखा अभियंता संजय देवराव बढीये (५१) यांचा सावंगी (मेघे)....

'That' zip Branch Engineer's death | ‘त्या’ जि.प. शाखा अभियंत्याचा मृत्यू

‘त्या’ जि.प. शाखा अभियंत्याचा मृत्यू

खळबळ : प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
वर्धा : जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागातील शाखा अभियंता संजय देवराव बढीये (५१) यांचा सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात रविवारी सायंकाळी ५ वाजता मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून जिल्हा परिषद वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी जिल्हा परिषद प्रशासन रोखठोक भूमिका घेते वा प्रकरणावर पडदा टाकते, याकडे आता जनतेचे लक्ष लागले आहे. सदर घटनेने बढीये कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबीय शोकमग्न अवस्थेत असल्यामुळे त्यांची याबाबतची भूमिका कळू शकली नाही.
शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत दोन सदस्यांनी शाखा अभियंता संजय बढीये यांच्यावर घणाघाती आरोप केले. त्यांचे नाव घेऊन हा अधिकारी भ्रष्ट आहे. त्याला तातडीने निलंबित करून त्याची हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी त्या दोन सदस्यांनी लावून धरली. वास्तविक, कोणत्याही प्रकरणात बढीये यांनी भ्रष्टाचार केला नसल्यामुळे झालेल्या या गंभीर आरोपामुळे त्यांची मनस्थिती ढासळली, यामुळेच त्यांना बे्रन हॅम्रेज झाले असावे, अशी चर्चा जि.प. वर्तुळात आहे.
शनिवारी बढीये यांना सावंगी येथील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांची स्थिती इतकी नाजुक होती की त्यांना अतिदक्षता विभागात नेण्यापूर्वीच कृत्रिम जीवन प्रणाली लावावी लागली. त्यांना वाचविण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शर्थीने प्रयत्न केले. मात्र यात त्यांना यश आले नाही. आज संजय बढीये या शाखा अभियंत्याची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आई, वडील(सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक), पत्नी, मुलगा व दोन भाऊ व बहीण असा आप्त परिवार आहे. या घटनेने जिल्हा परिषदेतील कर्मचारी आणि अधिकारी वर्गांमध्येही हळहळ व्यक्त होत आहे. बढीये यांच्या मृत्यूमागे नेमके कोणते कारण आहे, याचा शोध जिल्हा परिषद प्रशासन घेईल काय, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. ‘जि.प.च्या शाखा अभियंत्याला ब्रेन हॅम्रेज’ या शीर्षकाखाली आज ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्ताबाबत अनेकांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी संपर्क साधून वस्तुस्थिती पुढे आणल्याचे समाधान व्यक्त केले. बढीये यांचा नाहक बळी गेला, असेही ते बोलत होते.(जिल्हा प्रतिनिधी)

राजकारणाची पातळी खालावली
सुस्वभावी, सर्वांशी मिळून मिसळून काम करणारा अधिकारी म्हणून संजय बढीये हे जिल्हा परिषदेत परिचित होते. जो भ्रष्टाचार करतो. त्याच्यावर भ्रष्टाचाराचे वा अन्य कितीही आरोप लागले तरी ते निर्ढावल्यागत वावरतात. बढीये हे त्यातले असते तर त्यांनाही अशापद्धतीने अपमानित करणारी बाब असह्य झाली नसती. ते ज्या विभागात कार्यरत होते. त्या विभागातील कोणत्याही भ्रष्टाचारात त्यांचा हात असल्याची कुठलीही बाब पुढे आली नसताना केवळ घाणेरड्या राजकारणातून आपला उल्लू सरळ करण्यासाठी त्यांच्यावर नाहक आरोप केल्या गेले, यात त्यांचा बळी गेला, अशी चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात चर्चिली जात आहे.

Web Title: 'That' zip Branch Engineer's death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.