जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ ‘अनअपडेटेड’
By Admin | Updated: August 4, 2016 00:34 IST2016-08-04T00:34:53+5:302016-08-04T00:34:53+5:30
भारताने डिजिटल इंडियाचा नारा दिला आहे. प्रत्येक बाबीची तंत्रज्ञानावर तुलना होत आहे. तंत्रज्ञानाचे लोण शासनाच्या प्रत्येक विभागापासून जिल्हा परिषदेपर्यंत पसरले आहे.

जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ ‘अनअपडेटेड’
आवश्यक माहितीचाच अभाव : अनेक दिवसांपासून संकेतस्थळ बॅकडेटमध्ये
पराग मगर वर्धा
भारताने डिजिटल इंडियाचा नारा दिला आहे. प्रत्येक बाबीची तंत्रज्ञानावर तुलना होत आहे. तंत्रज्ञानाचे लोण शासनाच्या प्रत्येक विभागापासून जिल्हा परिषदेपर्यंत पसरले आहे. त्यामुळे जिल्हास्तरावरही प्रत्येक जिल्ह्याचे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाची, तेथील कामकाजाची, विभागांची, अधिकारी व लोकप्रतिनिधींची, योजनांची माहिती यातून मिळावी, हा उद्देश असतो; पण वर्धा जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ याबाबतीत पूर्णत: अपयशी ठरले आहे. यामुळे हे संकेतस्थळ ‘अनअपडेटेड’ असल्याची प्रतिक्रिया संकेतस्थळाला भेट देणारे व्यक्त करतात.
तंत्रज्ञानामुळे प्रत्येक बाब सोपी होत आहे. नागरिकांचा त्रास कमी व्हावा, शासनाद्वारे जि.प. व पं.स. स्तरावरील योजनांची माहिती नागरिकांना व्हावी, यासाठी संकेतस्थळ निर्माण केले जाते. जिल्हा स्तरावरील शासनाचे आदेश, आवश्यक सूचना आदीबाबत माहिती जि.प.च्या संकेतस्थळावर मिळावी, ही अपेक्षा असते; पण वर्धा जि.प. चे संकेतस्थळ ही अपेक्षा पूर्ण करण्यात कुचकामी ठरत आहे. या संकेतस्थळाला भेट देताना पहिली अडचण म्हणजे अनेकदा त्यात ‘एरर’ येऊन संकेतस्थळ उघडत नाही. एखाद्या विभागाबाबत माहिती हवी असल्यास ‘डिपार्टमेंट’ या शब्दावर ‘क्लिक’ केल्यास विभागांची यादी उघडते. एखाद्या विभागाची माहिती हवी असल्यास त्या नावावर ‘क्लिक’ करावे लागते. यानंतर कधीकाळी ‘स्कॅन’ करून टाकण्यात आलेली पाने ‘डाऊनलोड’ करावी लागतात. यात काही बदल करायचा असल्यास जि.प. प्रशासनालाही ते शक्य होत नाही. दुसरीच यादी टाकावी लागते. यामुळे नसलेले पदाधिकारी आजही कागदोपत्री विभागात कार्यरत दिसतात. युवकांना स्पर्धा परीक्षेसाठी जिल्हा प्रशासनाबाबत काही माहिती हवी असल्यास ते या संकेतस्थळाला भेट देतात; पण आवश्यक माहिती मिळत नसल्याची ओरड युवक करीत असतात.