जिल्हा परिषदेचे ६१ मुख्याध्यापक पदावर कायम
By Admin | Updated: August 30, 2014 01:59 IST2014-08-30T01:59:25+5:302014-08-30T01:59:25+5:30
शासनाच्या आदेशाप्रमाणे पटसंख्येची अट ठेवत जिल्हा परिषदेच्या काही उच्च श्रेणी मुख्यध्यापकांना पदावनत करण्यात आले होते.

जिल्हा परिषदेचे ६१ मुख्याध्यापक पदावर कायम
वर्धा : शासनाच्या आदेशाप्रमाणे पटसंख्येची अट ठेवत जिल्हा परिषदेच्या काही उच्च श्रेणी मुख्यध्यापकांना पदावनत करण्यात आले होते. यावर जिल्ह्यातील ६१ शिक्षकांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायालयाने शिक्षकांच्या बाजूने निर्णय दिला. यामुळे या ६१ शिक्षकांना मुख्याध्यापक पदावर कायम ठेवावे, असे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यांनी निर्गमित केले आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांमधे २६२ उच्च श्रेणी मुख्याध्यापक कार्यरत आहेत. अशात शिक्षण संचालकांच्या २० मे २०१४ च्या पत्रानुसार १५० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील उच्च श्रेणी मुख्याध्यापकांना पदावनत करण्याच्या सूचना आल्या. या आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी २ जुलै २०१४ रोजी आदेश काढत १९४ उच्च श्रेणी मुख्याध्यापकांना पदावनत करून सहाय्यक शिक्षक केले होते. यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात चांगलाच वादंग उठला होता. यावर निवेदन देण्यात आले तरी काहीच कारवाई झाली नाही. यामुळे पदावनत केलेल्या १९४ पैकी ६१ मुख्याध्यापकांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या पाठिंब्याने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात तीन याचिका दाखल केल्या होत्या. न्यायालयाने याचिका दाखत करून घेत या मुख्याध्यापकांना त्यांच्या पदावर कायम ठेवण्याचा आदेश पारीत केला. न्यायालयाच्या या आदेशानुसार पदावनात केलेल्या मुख्याध्यापकांपैकी ज्या ६१ जणांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली त्यांना उच्च न्यायालयाच्या पुढील आदेशापावेतो उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदावर कायम ठेवावे असा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी २७ आॅगस्ट रोजी काढला. या आशयाचे पत्र पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.(प्रतिनिधी)