जिल्हा परिषदेत शिक्षक बदली घोटाळा

By Admin | Updated: August 15, 2015 02:05 IST2015-08-15T02:05:05+5:302015-08-15T02:05:05+5:30

जिल्हा परिषदेत जिल्ह्यातील आठही गट शिक्षणाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांना असलेल्या अधिकारांना मुठमाती देत परस्पर ३९ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्याची खळबळजनक माहिती आहे.

Zilla Parishad teachers change exchange scam | जिल्हा परिषदेत शिक्षक बदली घोटाळा

जिल्हा परिषदेत शिक्षक बदली घोटाळा

३९ शिक्षकांच्या परस्पर बदल्या : शिक्षण समितीने वापरले विभागीय आयुक्तांचे अधिकार
लोकमत विशेष
राजेश भोजेकर वर्धा
जिल्हा परिषदेत जिल्ह्यातील आठही गट शिक्षणाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांना असलेल्या अधिकारांना मुठमाती देत परस्पर ३९ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्याची खळबळजनक माहिती आहे. एकप्रकारे झालेल्या या कथित बदली घोटाळ्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाल्याची चर्चा जि.प. वर्तुळात आहे.
अंगलट आलेले प्रकरण निस्तारण्यासाठी शुक्रवारी जि.प. शिक्षण सभापती मिलिंद भेंडे यांच्या कक्षात आठही गटशिक्षणाधिकारी एकत्र आले होते. यावेळी झालेली चूक सुधारण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मिना यांची मनधरणी कशी करता येईल, या अनुषंगाने चर्चा झाल्याची माहिती आहे.
या बदल्या कोणाच्या सल्ल्याने झाल्या. यामध्ये किती रुपयांची आर्थिक उलाढल झाली याचीही चर्चा जिल्हा परिषदेत वर्तुळात चवीने सुरू आहे. सदर प्रकरण विभागीय आयुक्त व सीईओंच्या अधिकाराचे हनन करणारे असल्यामुळे त्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना क्लिनचीट दिली तरी कागदोपत्री झालेला हा बदलीचा प्रकार सावरण्यासारखा नाही. आणि तो सावरला तर प्रकरण विभागीय आयुक्त आणि सीईओंच्या अंगलट येण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. यामुळे सीईओंनीही सदर प्रकरणात हात वर केल्यामुळे गटशिक्षणाधिकारी चांगलेच कात्रीत सापडले आहेत. क्लिनचीट मिळावी म्हणून या कथित घोटाळ्यात अडकलेल्या गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून काही शिक्षण संघटनांना हाताशी धरुन सीईओंवर दबाब आणण्याची चर्चाही शिक्षण विभागात ऐकायला मिळाली. तसेच सामूहिक रजेवर जाण्याबाबतही विचारमंथन झाल्याची चर्चा आहे.
जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचा नियमित बदल्यांचा सर्वाधिकार प्रशासकीय अधिकारी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आहे. नियमितशिवाय बदल्या करावयाच्या असल्यास विभागीय आयुक्तांना अधिकार आहे. मात्र जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही अंधारात ठेवून गेल्या २५ जूनच्या बैठकीत सदर बदल्यांचा ठराव पारीत करुन गटशिक्षणाधिकाऱ्यांना तसेच आदेश दिल्याचे समजते. ही बाब मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मिना यांना माहिती होताच त्यांना धक्काच बसला. या प्रकरणी त्यांनी नेमके नियमावर बोट ठेवल्यामुळे ज्यांनी या बदल्या केल्या व घडवून आणल्या त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याची माहिती आहे. एका अधिकाऱ्याने हा प्रकार केला असता तर तो समजण्यासारखा होता. मात्र आठही गटशिक्षणाधिकाऱ्यांनी या बदल्या केल्यामुळे हा नियोजनबद्ध शिक्षक बदली घोटाळा असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी सीईओंनी विभागीय चौकशीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविल्याची माहिती आहे. याप्रकरणी सीईओंनी कार्यवाहीचे संकेतही दिले आहे.
गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून बचावासाठी असाही दबाब?
प्रकरण अंगलट येणार असल्याची बाब लक्षात येताच गटशिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेत धाव घेतली. प्रकरण गंभीर असल्यामुळे सीईओंनी हात वर केल्याचे समजते. अशातच शिक्षण सभापती मिलिंद भेंडे यांच्या कक्षात सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांची बैठक झाली. यामध्ये कार्यवाही रोखण्यासाठी सीईओंवर दबाब आणणे आवश्यक आहे. यासाठी सामूहिक रजेचे शस्त्र उगारण्यावर चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्राने ‘लोकमत’ला दिली.
बदल्यांचे नियम
नियमित बदल्या मे महिन्यातच केल्या जाऊ शकतात. याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आहेत.१८ मे २०१५ च्या शासन परिपत्रकानुसार, नियमित बदल्याशिवाय केवळ आपसी बदल्या इतरवेळी करता येत नाही. या बदल्यांचे अधिकार विभागीय आयुक्तांना आहे. शिक्षण समितीला बदल्यांचे कोणतेही अधिकारी नाही, असेही सूत्राने सांगितले.
तब्बल ३९ शिक्षकांच्या बदल्या शिक्षण समितीने ठराव घेऊन गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत परस्पर केल्या. वास्तविक, नियमित वगळता इतरवेळेस बदल्या करण्याचा अधिकार विभागीय आयुक्तांना आहेत. मात्र असे न होता त्यांच्या अधिकाराचे शिक्षण व समितीने परस्पर हनन केले ही गंभीर बाब आहे. याबाबत सीईओंनाही अंधारात ठेवले.यावर रितसर कार्यवाही होईल.
- चित्रा रणनवरे, अध्यक्ष, जि.प.वर्धा.
३९ शिक्षकांच्या परस्पर बदलीप्रकरणी गटशिक्षणाधिकाऱ्यांचे बयाण नोंदविण्यात आले आहे. याबाबत सविस्तर अहवाल तयार झाल्यानंतर पुढील कार्यवाही येत्या दोन दिवसात करण्यात येईल.
- संजय मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.वर्धा.
त्या बदल्या नाही. विद्यार्थ्यांच्या अध्यापनात खंड पडू नये म्हणून तात्पूरत्या स्वरुपात व्यवस्था करण्यात आली आहे. नियमित शिक्षक रुजू झाल्यास ते शिक्षक परत जाईल. हा शिक्षण समितीने घेतलेला धोरणात्मक निर्णय आहे. तो घेण्याचा अधिकारही शिक्षण समितीला आहे.
- मिलिंद भेंडे, सभापती, शिक्षण समिती, जि.प.वर्धा.

Web Title: Zilla Parishad teachers change exchange scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.