पंचधारा धबधब्यात बुडून युवकाचा मृत्यू
By Admin | Updated: August 31, 2015 01:50 IST2015-08-31T01:50:00+5:302015-08-31T01:50:00+5:30
रायपूर नजीकच्या पंचधारा नदीवरील धबधब्यात वर्गमित्रांसोबत पोहायला गेलेल्या आंजी (मोठी) येथील १६ वर्षीय तुषार गजानन सावळे नामक युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

पंचधारा धबधब्यात बुडून युवकाचा मृत्यू
आकोली/आंजी (मो.) : रायपूर नजीकच्या पंचधारा नदीवरील धबधब्यात वर्गमित्रांसोबत पोहायला गेलेल्या आंजी (मोठी) येथील १६ वर्षीय तुषार गजानन सावळे नामक युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तो त्याच्या घरच्यांना एकुलता एक मुलगा होता. ही घटना रविवारी सकाळी उघड झाली.
पंचधारा धरण ज्या नदीवर बांधले आहे त्या नदीच्या उगमस्थानावर रायपूर नजीक धबधबा आहे. आंजी येथील पहिल्या वर्गापासून एकत्र शिकलेले ११ मुले धबधब्यावर पोहायला गेले. पोहात असताना तुषार हा अचानक दिसेनासा झाला. त्यामुळे मुलांनी रायपूरला जाऊन मदत मागितली. गावातील तरुणांनी खोल पाण्यात त्याचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह हाती लागला. तुषार हा वर्धेत अकराव्या वर्गात शिकत होता. या दुदैवी घटनेने आंजीत शोककळा पसरली आहे. घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता सेवाग्राम येथे पाठविला. ठाणेदार बाकल, धवने, वैद्य तपास करीत आहेत.(वार्ताहर)
दोन घटनांत गावकऱ्यांनी वाचविले चौघांचे जीव
गत महिन्यात तीन युवक ग्रामस्थांना येथे गटांगळ्या खाताना दिसले. यावेळी गावातील युवकांनी पाण्यात उड्या घेत त्यांना वाचविले. तर दुसऱ्या घटनेत धबधब्यातील दगडावरून उडी घेतल्याने रक्तबंबाळ झालेल्या युवकाला गावातील तरुणांनी रुग्णालयात नेले असल्याची माहिती आहे.