विजेच्या खांबावरच युवकाचा मृत्यू
By Admin | Updated: June 17, 2016 02:29 IST2016-06-17T02:29:03+5:302016-06-17T02:29:03+5:30
विजेच्या खांबावर बिघाड दुरूस्त करताना लागलेल्या धक्क्याने येथील युवकाचा खांबावरच मृत्यू झाला.

विजेच्या खांबावरच युवकाचा मृत्यू
टाकरखेड : विजेच्या खांबावर बिघाड दुरूस्त करताना लागलेल्या धक्क्याने येथील युवकाचा खांबावरच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. राजेंद्र लक्ष्मण मोहोड (२८) रा. टाकरखेड असे मृतक युवकाचे नाव आहे.
राजेंद्र मोहाडे हा वीज उपकरणे दुरूस्ती करण्यासह नांदपूर विद्युत कार्यालयाअंतर्गत वीज वितरण कंपनीचे खासगीत कामही करीत होता. गावातील अशोक चौधरी यांच्या घरचा विद्युत पुरवठा खंडित झाल्याची माहिती राजेंद्रला दिली. यावर राजेंद्रने कुठलीही शहानिशा न करता खांबावर चढून बिघाड दुरूस्त करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, त्याचा जिवंत ताराला स्पर्श झाल्याने घटनास्थळीच मृत्यू झाला. राजेंद्रचा एका वर्षापूर्वीच विवाह झाला होता. घटनेची माहिती मिळताच विद्युत वितरण कंपनीचे विभागीय उपअभियंता राजेश जयस्वाल, ठाणेदार अशोक चौधरी यांनी घटनास्थळ गाठत पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. राजेंद्रच्या मृत्यूने त्याचा परिवार उघड्यावर आल्याने त्यांना महावितरण कंपनीच्यावतीने मदत देण्याची मागणी जोर धरत आहे.(वार्ताहर)