देश आणि देहासाठी युवकांनी एक तास द्यावा- एन. सुब्बाराव

By Admin | Updated: June 30, 2015 02:45 IST2015-06-30T02:45:25+5:302015-06-30T02:45:25+5:30

मनाचे संतुलन, दृढ आत्मविश्वास स्वामी विवेकानंदाच्या अध्यात्मिक शिकवणीवर आजच्या युवकांनी भर द्यावा, तसेच

Youth should give one hour to country and body - N Subbarao | देश आणि देहासाठी युवकांनी एक तास द्यावा- एन. सुब्बाराव

देश आणि देहासाठी युवकांनी एक तास द्यावा- एन. सुब्बाराव

नेहरू युवा केंद्राची पुनर्जागरण यात्रा : खासदारांनी दाखविली हिरवी झेंडी
वर्धा: मनाचे संतुलन, दृढ आत्मविश्वास स्वामी विवेकानंदाच्या अध्यात्मिक शिकवणीवर आजच्या युवकांनी भर द्यावा, तसेच देशासाठी आणि देहासाठी रोज एक तास देऊन ग्रमोद्योगाला चालना देण्यासाठी पुढे यावे, असे मार्गदर्शन सामाजिक कार्यकर्ते एन. सुब्बाराव यांनी केले.
विकास भवन येथे सोमवारी नेहरू युवा केंद्राच्या पुनर्जागरण यात्रेच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खा. रामदास तडस, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, केंद्राच्या समन्वयक ज्योती मोहिते यांची उपस्थिती होती.
खा. तडस म्हणाले, देशात परिवर्तन केवळ युवकच घडवू शकतात. प्रत्येक अडचणीवर युवकच प्रभावीपणे मात करू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनानुसार लोकप्रतिनिधींनी शेवटच्या घटकापर्यंत पोहचून शासनाच्या योजना प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत मिळवून द्याव्यात. नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून पुनर्जागरण यात्रा सुरू होत आहे. त्याचा लाभ जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंत होणे अपेक्षित असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
नेहरू युवा केंद्राच्या या उपक्रमातून नेतृत्त्वाची उभारणी होण्यास मदतच होणार आहे. याच युवकांच्या माध्यमातून त्यांना प्रशासनाकडून प्रशिक्षित करून शासनाच्या विविध योजना पथनाट्याच्या माध्यमातून जनतेपर्यंत यापुढेही पोहचविण्याचा विचार करण्यात येईल. या युवकांकडून जनसामान्यांच्या असलेल्या अडीअडचणीही समजून घेण्यास मदतच होणार आहे. ही यात्रा १०४ गावात पथनाट्याच्या माध्यमातून योजनांची माहिती देणार आहे. या यात्रेचा युवकांनी अधिकाधिक फायदा घेऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे जिल्हाधिकारी आशुतोष सलील यावेळी म्हणाले.
प्रारंभी स्वामी विवेकानंद आणि दिनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पुजन करून दीपप्रज्वलनाने यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. मान्यवरांचे स्वागत केंद्राच्या जिल्हा समन्वयक ज्योती मोहिते यांनी केले. तसेच एन. सुब्बाराव यांचा परिचय करून दिला. शेतकरी आत्महत्येवर आधारित पथनाट्य सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता झाली.
पथनाट्याच्या यात्रेला एन. सुब्बाराव यांच्या उपस्थितीत खा. तडस, जिल्हाधिकारी सलील यांनी हिरवी झेंडी दाखविली. जिल्हा युवा सल्लागार समितीचे हेमचंद्र वैद्य, जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष रेवतकर, पिपल्स फॉर अ‍ॅनिमलचे आशिष गोस्वामी, निसर्ग सेवा समितीचे मुरलीधर बेलखोडे, प्रहारचे प्रा. मोहन गुजरकर यावेळी उपस्थिती होते.(प्रतिनिधी)

Web Title: Youth should give one hour to country and body - N Subbarao

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.