वाघाच्या हल्ल्यात युवक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 06:00 IST2019-10-06T06:00:00+5:302019-10-06T06:00:27+5:30
सायंकाळी सर्व जनावरे घराकडे परत गेली परंतु भुमेश घरी न परतल्याने परिवारातील सदस्यांना संशय आला. त्यामुळे गावातील शंभरावर गावकऱ्यांनी शेतशिवारात जाऊन शोध घेतला असता शेताच्या नाल्याजवळ भुमेशचा मृतदेह छिन्नविछिन्न स्थितीत आढळून आला. घटनेची माहिती कारंजा येथील वनविभाग व पोलिसांना देण्यात आली. लागलीच वनविभागाचे अधिकारी, ठाणेदार राजेंद्र शेटे व त्यांचे सहकारी यशवंत गोहत्रे घटनास्थळी दाखल झाले.

वाघाच्या हल्ल्यात युवक ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (घा.) : जनावरे सोडण्याकरिता शेतात गेलेल्या युवकावर दबा धरुन बसलेल्या वाघाने हल्ला चढवून त्याला ठार केले. ही घटना आगरगाव शिवारात शुक्रवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली. त्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयात आक्रोश करीत तत्काळ मृतकाच्या परिवाराला नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. यावेळी काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
भुमेश रमेश गाखरे (२२) असे मृत युवकाचे नाव आहे. तो नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी घरची जनावरे चारण्याकरिता शेतात गेला होता. जनावरे चारल्यानंतर शेतात बांधून तो जेवन करण्याकरिता दुपारी घरी परत आला. जेवन करुन चार वाजता पुन्हा जनावरे सोडण्याकरिता शेतात गेला असता दबा धरुन बसलेल्या वाघाने भुमेशवर अचानक हल्ला चढविला. यात तो जागीच गतप्राण झाला. सायंकाळी सर्व जनावरे घराकडे परत गेली परंतु भुमेश घरी न परतल्याने परिवारातील सदस्यांना संशय आला. त्यामुळे गावातील शंभरावर गावकऱ्यांनी शेतशिवारात जाऊन शोध घेतला असता शेताच्या नाल्याजवळ भुमेशचा मृतदेह छिन्नविछिन्न स्थितीत आढळून आला. घटनेची माहिती कारंजा येथील वनविभाग व पोलिसांना देण्यात आली. लागलीच वनविभागाचे अधिकारी, ठाणेदार राजेंद्र शेटे व त्यांचे सहकारी यशवंत गोहत्रे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करुन ग्रामीण रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
पण, येथील डॉक्टरांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिल्याने नागरिकांच्या आक्रोश वाढला. यावेळी स्थनिक लोकप्रतिनिधींनी रुग्णालयात धाव घेत डॉक्टरांना धारेवर धरल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी नातेवाईकांनी मृतकाच्या परिवाराला तत्काळ मदत आणि घरातील एका व्यक्तिला कायमस्वरुपी नोकरी देण्याची मागणी केली. त्यामुळे काही काळ वातावरण चांगलेच तापले होते.
वाघाची दहशत कायम
तालुक्यात मागील तीन महिन्यांपासून वाघाची दहशत कायम आहे. यापूर्वी धानोली येथील शेतकºयावर वाघाने हल्ला केला होता. तर दुसरी घटना सिंदीविहिरी येथे घडली.येथेही शेतकºयावर हल्ला केला पण ते थोडक्यात बचावले. आजची तिसरी घटना असून परिसरात वाघाने चांगलाच धुमाकूळ घातल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतीची कामे आता कशी करावी, असा प्रश्न शेकऱ्यांना पडला असून वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करावा अन्यथा होणाºया नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी गावकºयांनी केली आहे.