राज्यघटनेच्या संरक्षणाची जबाबदारी नागरिक म्हणून आपली

By Admin | Updated: February 26, 2016 02:42 IST2016-02-26T02:42:45+5:302016-02-26T02:42:45+5:30

स्वातंत्र्यापूर्वीचा इतिहास स्त्री-पुरूष समानतेचा नाही. १९५० मध्ये आपली राज्यघटना तयार झाली आणि सर्वांना समान अधिकार मिळाले.

Your responsibility as citizen of the Constitution is to protect the Constitution | राज्यघटनेच्या संरक्षणाची जबाबदारी नागरिक म्हणून आपली

राज्यघटनेच्या संरक्षणाची जबाबदारी नागरिक म्हणून आपली

लीलाताई चितळे : विदर्भस्तरीय महिला सरपंच संवाद मेळावा
वर्धा : स्वातंत्र्यापूर्वीचा इतिहास स्त्री-पुरूष समानतेचा नाही. १९५० मध्ये आपली राज्यघटना तयार झाली आणि सर्वांना समान अधिकार मिळाले. सरपंच म्हणून तुम्ही शासकीय यंत्रणेचा भाग आहात. तुमच्या आवाजाला महत्त्व आहे. म्हणून समाज परिवर्तनाला गती दिली पाहिजे. २१ व्या शतकात जगत असतानाही समाज इतिहासातच राहून विचार करतो. ही मानसिकता बदलण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. राज्यघटनेच्या संरक्षणाची जबाबदारी एक नागरिक म्हणून आपली आहे. याचे भान असू द्या. प्रेम व निर्भयतेने सामोरे जा, असे आवाहन नागपूरच्या ज्येष्ठ सर्वोदय कार्यकर्त्या लीलाताई चितळे यांनी केले.
श्रीकृष्णदास जाजू ग्रामीण सेवा महाविद्यालय पिपरीद्वारे सोमवार व मंगळवारी दोन दिवसीय विदर्भस्तरीय महिला सरपंच संवाद मेळावा घेण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. स्वातंत्र्यपूर्व काळात ज्या मूल्यांसाठी लढा दिला, स्त्री-पुरूषांना समानतेने जगता यावे याचा आग्रह धरला, त्या बाबी तुम्हाला पाहून बऱ्याच अंशी पूर्र्ण झाल्याचे समाधान वाटते, असे मतही चितळे यांनी व्यक्त केले.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सुमन बंग तर अतिथी म्हणून संध्या सातपुते, अ‍ॅड. शीतल भुरे, सुचेता इंगोले आदी उपस्थित होते. बंग यांनी सर्व महिला सरपंचांनी गावातील महिलांना सन्मानाने जगता यावे यासाठी व्यसनमुक्ती, दारूबंदीसारखे कार्यक्रम अग्रक्रमाने गावात राबवावे, असे सांगितले.
दुपारच्या सत्रात सरपंच महिलांनी जि.प. प्रशासन, रेशन, वनविभाग आणि पोलीस प्रशासनाशी निगडीत कामाचे अनुभव, अडचणी व्यक्त केल्या. अन्य गावांतील महिला सरपंचांच्या अनुभवातून काही मुद्यांचा खुलासा झाला. सायंकाळच्या सत्रात महिला राजसत्ता आंदोलनाच्या रत्नामाला, मालती आणि शारदा यांनी चटईच्या आकाराच्या सापशिडीच्या खेळाद्वारे ग्रा.पं. चा कारभार, आर्थिक, व्यवहार, लोकसहभाग, नियमांची माहिती आदी प्रमुख मुद्यांचे विवेचन केले. रात्रीच्या सत्रात चेतना विकासच्या समुपदेशक संध्या सातपुते, अ‍ॅड. शीतल भुरे व सुचेता इंगोले यांनी कौटुंबिक हिसांचार व महिलांबाबत विविध कायद्यांची माहिती दिली. गावात घडणाऱ्या घटनांची नोंद घेऊन समाधान केंद्रामार्फत गरजू महिलांना आवश्यक कायदेशीर सल्ला व आधार मिळवून देता येईल, असे सांगितले. संचालन नूतन माळवी यांनी केले.
महिला सरपंच संवाद मेळाव्याला भंडारा, यवतमाळ, चंद्रपूर व वर्धेच्या बहुसंख्य महिला सरपंच उपस्थित होत्या. मान्यवरांचे स्वागत प्राचार्य डॉ. पुरूषोत्तम कालभूत यांनी केले. प्रास्ताविक अतुल शर्मा यांनी केले. संचालन प्रा. राजेश देशपांडे व प्रा. सलीम मोहम्मद यांनी केले. कार्यक्रमाला प्राध्यापक, विद्यार्थी, ग्रामविकास तंत्रनिकेतनचे कार्यकर्ते, वसतिगृहाच्या प्रभारी आदींनी सहकार्य केले.(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Your responsibility as citizen of the Constitution is to protect the Constitution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.