‘आपले सरकार’ वेब पोर्टल हक्काचे माध्यम
By Admin | Updated: January 28, 2016 02:05 IST2016-01-28T02:05:30+5:302016-01-28T02:05:30+5:30
राज्यातील नागरिकांना त्यांच्या तक्रारींचे एकाच ठिकाणी निवारण करण्यासाठी ‘आपले सरकार’ या ‘वेब पोर्टल’च्या माध्यमातून आॅनलाईन संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

‘आपले सरकार’ वेब पोर्टल हक्काचे माध्यम
आशुतोष सलील : प्रजासत्ताक दिन थाटात; विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक व पोलिसांच्या कवायतींनी जिंकली मने
वर्धा : राज्यातील नागरिकांना त्यांच्या तक्रारींचे एकाच ठिकाणी निवारण करण्यासाठी ‘आपले सरकार’ या ‘वेब पोर्टल’च्या माध्यमातून आॅनलाईन संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तक्रार निवारणासोबतच विविध सेवांसाठी हक्काचे माध्यम म्हणूनही या संधीचा लाभ जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी केले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुलावर आयोजित मुख्य समारंभात जनतेला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यपालन अधिकारी संजय मिना, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, सर्व विभागांचे प्रमुख, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पोलीस विभागाचे पथसंचलन, शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम व कवायीतींनी प्रजासत्ताक दिन थाटात साजरा झाला. सर्व विभागांचे प्रमुख वरिष्ठ अधिकारी, विविध शाळांचे विद्यार्थी, पोलीस विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सलील म्हणाले की, नागरिकांना आपले सरकार या संकेतस्थळावर जाऊन अगदी घर बसल्या जलद सेवेचा लाभ घेता येऊ शकतो. वेळेची बचत होऊन आपण नोंदविलेल्या तक्रारी, त्यावरील कार्यवाहीची सद्यस्थिती या संकेतस्थळाच्या माध्यमातून कळण्यास मदत होईल. दूरवरून येणाऱ्या लोकांसाठी जिल्हा प्रशासन आणि मंत्रालयीन विभागाशी संबंधित तक्रारी आॅनलाईन दाखल करण्यासही मदत होईल.
प्रारंभी जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उपस्थितांनी झेंड्याला मानवंदना देऊन राष्ट्रगीत गायिले. जिल्हाधिकाऱ्यांनी पथसंचालनाचे निरीक्षण केले. पथसंचालनामध्ये वर्धा जिल्हा पोलीस, महिला पोलीस, होमगार्ड, महिला होमगार्ड, एनसीसी बटालियन, न्यू इंग्लिश हायस्कूल, मॉडेल हायस्कूल, भारत ज्ञान मंदिरम्, स्वावलंबी विद्यालय, केसरीमल कन्या शाळा, जवाहर नवोदय विद्यालय, पुलगावच्या इंडियन मिलिटरी स्कूल, एनसीसी पथक, जिल्हा पोलीस, होमगार्उच्या सामूहिक बॅन्ड पथकातील प्लॉटूनने पथसंचलन केले. यासाठी राखीव पोलीस दलाचे पोलीस निरीक्षक आर.एस. चारथळ यांनी मार्गदर्शन केले. पोलीस विभागाच्या परिविक्षाधीन पोलीस अधिकारी नीलोत्पल आणि सेकंड इन कमांड परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सचिन हिरे यांनी पथसंचलन केले.
यानंतर जिल्हाधिकारी सलील यांनी मान्यवरांच्या भेटी घेतल्या. जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ नागरिक, स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी यांची प्रमुख उपस्थिती होती. पोलीस विभागामार्फत बुलेटवर विविध चित्तथरारक कवायती सादर करण्यात आल्या. संचालन ज्योती भगत आणि अजय येते यांनी केले.(कार्यालय प्रतिनिधी)
अनेकांचा गौरव
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत उत्कृष्ट कामगिरीबाबत शासनाच्या जिल्हास्तरावरील पुरस्कार स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्यांचे जिल्हाधिकारी सलील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. मॉडेल हायस्कूलच्या सहायक शिक्षक शीला गिरी, आष्टी तालुक्यातील जोलवाडीच्या तुषार नेहारे यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता पाणी भरून असलेल्या ऊर्ध्व वर्धा कालव्यात उडी घेत सुमीत उमरकरला कालव्यातून बाहेर काढून त्याचा जीव वाचविल्याबद्दल तुषारला प्रशस्तीपत्र देऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
भारत स्काऊटस् गाईडच्या वर्ग चौथीतील कब व बुलबुल सुवर्ण बाण राष्ट्रीय परीक्षेत प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांनाही प्रमाणपत्र देत गौरविण्यात आले. राष्ट्रपती पुरस्कार चाचणी शिबिरात यशस्वी स्काऊट्स गाईडना प्रमाणपत्र देण्यात आले. महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाकडून गरजू लाभार्थ्यांना स्वयंरोजगाराकरिता आर्थिक सहाय्य देण्यात येते. या कर्जाची परतफेड विहित मुदतीत करणाऱ्या जोत्सना उरकुडे, सविता उरकुडे, शरद ताकसांडे, प्रीती टेंभरे यांचाही सत्कार करण्यात आला.
राष्ट्रीय हरित सेनेंतर्गत जिल्ह्यात २५० इको क्लब स्थापित करण्यात आले. यातील पाच शाळांचा, साहसिक क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी करणारे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता ए.एम. खान, स्वच्छतेची चळवळ निर्माण करण्यासाठी तसेच युवा शक्तीचा सहभाग वाढविण्यासाठी स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेतील सागर कुबेटकर, शगुप्ता नाज अब्दुल हसन, वृषाली वाघमारे, राणी भांगे तर कनिष्ठ महाविद्यालयीन गटात रमी खेडीकर, चंचल वाधवाणी, प्रगती पिसुड्डे, किरण कापडे, मोहन गाखरे या विद्यार्थ्यांचा तर शिक्षण विभागातर्फे शारीरिक शिक्षक, संगीत शिक्षक, शास्त्रीय नृत्यात राज्यस्तरावर प्रथम गोरल पोहाणे हिचा, सामान्य रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी. हिवाळी अधिवेशनात बंदोबस्तातील होमगार्ड यांचाही सलील यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.